कारगील युद्धातील सेनानी देशाचे प्रेरणास्त्रोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:11 AM2021-07-27T04:11:38+5:302021-07-27T04:11:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘‘कारगिल युद्धातील अनुभवी सेनानी देशासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत,’’ असे प्रतिपादन लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘‘कारगिल युद्धातील अनुभवी सेनानी देशासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत,’’ असे प्रतिपादन लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नेन यांनी केले. पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे सोमवारी कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना जे. एस. नैन यांनी श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. विजयोत्सवाचे यंदाचे हे २२ वे वर्ष आहे.
कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत व पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला आॅपरेशन विजय नाव दिले होते. कारगिल युद्धाला सोमवारी २२ वर्षे पूर्ण झाली. भारतीय लष्कराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा ‘कारगिल विजय दिवस’
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे सोमवारी साजरा करण्यात आला. राष्ट्रीय यद्ध स्मारक येथे सकाळी लष्करातील वरिष्ठ अधिकारी, निवृत्त सैनिक उपस्थित होते. याप्रसंगी पुण्यातील सर्वात ज्येष्ठ सेनानी, मेजर जनरल हुक्कुर ए.के. (निवृत्त) यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
लेफ्टनंट जनरलर जे. एस. नैन म्हणाले, या युद्धातील शहिदांचा तसेच सहभागी झालेल्या वीर जवानांचा सर्वोच्च त्याग आणि देशसेवा कधीच विसरता येणार नाही. या या वीर योद्धांनी आखून दिलेल्या मार्गावरून भारतीय सेना मोठ्या ताकदीने योग्य दिशेने प्रगती करत आहे. भारतीय सैन्यदल देशासेवेप्रती संपूर्णतः कटिबद्ध आहे. भविष्यातील कोणत्याही संभाव्य घटनेला तोंड देण्यासाठी भारतीय सशस्त्रदल सुसज्ज आहे, अशी खात्री त्यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय युध्द स्मारक येथे उपस्थित असलेल्या सर्व निवृत्त सेनानींचा जे. एस. नैन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
चौकट
कारगिल विजय दिनानिमित्त लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारीतील सर्व लष्करी ठाण्यांवर आठवडाभर अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले. यामध्ये विविध सोहोळ्यात, शौर्य पुरस्कार विजेते, सेनेतील माजी अधिकारी आणि वीरनारी यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
------------------
चौकट
भारतीय जवानांनी दाखवला सर्वोच्च पराक्रम
६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या कारगिल युद्धामध्ये भारताचे ५२७
जवान शहीद झाले. १९६५ व १९७१ पेक्षा या युद्धाचे स्वरूप वेगळे होते. या दोन्ही
युद्धांमध्ये भारतीय सैन्य सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते. पण
कारगिल युद्धाच्या वेळी भारताने आपल्या हद्दीत राहून पाकिस्तानी सैन्याने
बळकावलेली ठाणी व भूप्रदेश पुन्हा ताब्यात घेतला. कारगिल युद्धामध्ये भारतीय
जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वोच्च पराक्रम दाखवला. ज्यामुळे शत्रू
फक्त चीत झाला नाही, तर त्याला तिथून पळ काढावा लागला होता.
फोटो : राष्ट्रीय युद्धस्मारक येथे कारगील युद्धातील शहिदांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहतांना दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन