Maharashtra | मारामारी करताेय? नोकरीसाठी अडचणीचे ठरू शकते भावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 11:08 AM2023-01-02T11:08:19+5:302023-01-02T11:08:30+5:30
मारमारीचे गुन्हे ठरू शकतात अडचणीचे...
पुणे : शिक्षण घेताना क्षुल्लक कारणांवरून रागाच्या भरात मारामारी करणे तसेच हिंसक आंदाेलनात सहभाग घेणे तुमच्या करिअरसाठी धाेकादायक ठरू शकते. मारामारी तसेच हिंसक आंदाेलनात सहभागी झाल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांत न्यायालयाने शिक्षा ठाेठावली, तर तुमच्या शासकीय नाेकरीच्या स्वप्नावर पाणी फेरू शकते.
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थी स्वत: तसेच मित्रांसाठी भांडणे आणि मारामाऱ्या करताना दिसून येतात. शिक्षण संस्था परिसरात विद्यार्थ्यांचे टाेळके विविध कारणांवरून हाणामाऱ्या करीत असतात. मात्र, अशाप्रकारे मारामारी दरम्यान समाेरच्या व्यक्तीला गंभीर दु:खापत झाली आणि पाेलिसांत गुन्हा दाखल झाला तर विद्यार्थ्यांचे करिअर आणि भविष्यासाठी ते महागात पडू शकते.
विद्यार्थी विविध आंदाेलनातही सहभागी हाेतात. रास्त मागण्यांसाठी पाेलिसांची पूर्वपरवानगी घेत संविधानिक मार्गाने शांततेत आंदाेलन करणाऱ्यांवर पाेलिसांकडून कारवाई हाेत नाही. मात्र, जमावबंदीचा आदेश धुडकावणे, ताेडफाेड करणे अथवा हिंसक पद्धतीने आंदाेलन केले तर आंदाेलकांवर गुन्हे दाखल हाेतात. दरम्यान, जनतेच्या हितासाठीच्या आंदाेलनात दाखल गुन्हे रद्दही हाेतात. मात्र, न्यायालयाने शिक्षा ठाेठावली तर शासकीय नाेकरीसाठी अडचणीचे ठरू शकते.
मारमारीचे गुन्हे ठरू शकतात अडचणीचे
मारामारी करताना समाेरील व्यक्तीच्या डाेक्यास अथवा इतर अवयवास मार लागून गंभीर जखम झाली तर तुमच्यावर कलम ३०७ अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल हाेऊ शकताे. त्यामध्ये न्यायालयाकडून शिक्षा हाेऊ शकते.
व्हेरिफिकेशन अर्जावर खोटी माहिती पडते उघड
शासकीय पदासाठी अर्ज करताना तुमच्यावर काेणता गुन्हा दाखल आहे का? तसेच न्यायालयात खटला सुरू आहे का? या संदर्भात माहिती भरून द्यावी लागते. तुम्ही अर्जात माहिती लपविली तर तुम्हाला कारणे दाखवा नाेटीस पाठविण्यात येते. खासगी नाेकरीसाठीही अनेक ठिकाणी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत आहे.
शिक्षा झाली तर शासकीस नाेकरी नाही
मारामारी प्रकरणी एक किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील अथवा एखाद्या गंभीर गुन्ह्यांत शिक्षा झाली असेल तर उमेदवारास शासकीय नाेकरी मिळण्यास अडचण येऊ शकते.
विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी?
महाविद्यालयात काही कारणांवरून मित्रासाेबत भांडण झाले अथवा काेणी धमकाविले तर थेट मारामारी करण्याऐवजी जवळच्या पाेलिस ठाण्यात जाऊन पाेलिसांची मदत घ्यावी. तसेच आंदाेलन केले तर ते शांततेच्या मार्गाने करावे.