'त्या'च्यासाठी एकच शब्द 'मृत्युंजय';३५ दिवस मृत्यूशी झुंज देत नवजात बालकाने जिंकली कोरोनाविरोधात लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 08:11 PM2020-08-18T20:11:24+5:302020-08-18T20:11:44+5:30
जन्मतः बाळाचे वजन होते फक्त १.८ किलो आणि त्यात ते कोरोनाबाधित...
पुणे : एका खाजगी रूग्णालयात आईने नऊ महिने पूर्ण होण्याआधीच बाळाला जन्म दिला. जन्मतः बाळाचे वजन फक्त १.८ किलो होते आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तपासणीअंती बाळ कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. बाळाला भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. पुढील दोन दिवसात बाळाची श्वासोच्छवासाची अडचण वाढत गेली. बाळाला २२ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. अद्ययावत उपचार आणि डॉक्टरांच्या टीमने दाखविलेल्या तत्परतेमुळे बाळाने ३५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर लढाई जिंकली.
कोरोनाबाधित बाळाला फुफ्फुसात ‘सर्फेक्टंट’ नावाच्या विशेष औषधाचे दोन डोस देण्यात आले. त्याला हाय फ्रीक्वेंसी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ऑक्सिजनच्या वितरणास मदत करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक विशेष वायू देखील वापरला गेला. इंट्रावेनस इम्युनोग्लोबुलिन ही विशेष थेरपीही दिली गेली.
एक्सरेमध्ये दोन्ही फुफ्फुसांत विस्तृत पसरलेला न्यूमोनिया दिसत होता. बाळाच्या रक्ताच्या सर्व तपासण्या ‘सायटोकाईन स्टॉर्म’ असल्याचे सूचित करत होत्या. बाळ आणि आई दोघांमध्येही अँटीबॉडी टेस्ट पॉझिटीव्ह आली. म्हणजे आईलाही कोरोना होऊन गेला होता. पालकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर बाळाला ५ दिवस उच्च डोस स्टिरॉइड्स दिले गेले. त्यानंतर बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली.
बाळ २२ दिवस व्हेंटिलेटरवर राहिले, त्यापैकी हाय फ्रीक्वेंसी वेंटिलेटर १६ दिवसांच्या कालावधीसाठी होते. ही एक अपवादात्मक घटना आहे. अखेरीस २५व्या दिवशी बाळास व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. या टप्प्यावर, छातीच्या सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुसात काही फायब्रोसिस दिसून आले. अशा प्रकारचे फायब्रोसिस गंभीर कोरोनामधून बऱ्या झालेल्या काही प्रौढ रुग्णांमध्ये दिसून आले आहेत. काही दिवसांच्या ऑक्सिजन थेरपीनंतर, ३५ व्या दिवशी बाळाला घरी सोडण्यात आले, अशी माहिती
नवजात बालक अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली.