झेन खान व ऑलिव्हर क्रॉफर्ड यांच्यात विजेतेपदासाठी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:23+5:302021-03-28T04:11:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित १५ हजार डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्ड व झेन खान यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम प्रवेश केला. भारताच्या मनीष सुरेशकुमारचा पराभव झाल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या एकेरीत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या झेन खानने विजयी मालिका कायम ठेवत स्वीडनच्या पाचव्या मानांकित जोनाथन म्रीधाचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना २ तास १३ मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये झेनने सुरेख खेळ करत वर्चस्व राखले. या सेटमध्ये झेनने जोनाथनची दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवरील जोनाथनने दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला जोरदार खेळ करत दुसऱ्या गेममध्ये झेनची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत आघाडी घेतली. पण ही आघाडी जोनाथनला फार काळ टिकविता आली नाही. झेनने पाचव्या व नवव्या गेममध्ये जोनाथनची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात ५-५ अशी बरोबरी साधली. झेनने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत पुढच्याच गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट जिंकून अंतिम फेरी गाठली.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या चौथ्या मानांकित ऑलिव्हर क्रॉफर्ड याने भारताच्या सहाव्या मानांकित मनीष सुरेशकुमारचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना १ तास २४ मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये पहिल्या गेममध्ये ऑलिव्हरने मनीषची, तर दुसऱ्या गेममध्ये मनीषने ऑलिव्हरची सर्व्हिस रोखली. त्यांनंतर पुढच्याच गेमला ऑलिव्हरने आपला रंगतदार खेळ सुरू ठेवत मनीषची पून्हा सर्व्हिस रोखली व सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील मनीषला सूर गवसला नाही.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्य(मुख्य ड्रॉ) फेरी :
एकेरी : पुरुष :
झेन खान, अमेरिका (८) वि.वि. जोनाथन म्रीधा, स्वीडन (५) ६-१, ७-५,
ऑलिव्हर क्रॉफर्ड, अमेरिका (४) वि.वि. मनीष सुरेशकुमार (६) ६-४, ६-२,