पुण्यामध्ये कुत्र्याच्या पिल्ल्यावरुन दोन गटात हाणामारी; २० जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 02:12 PM2021-10-05T14:12:18+5:302021-10-05T14:14:56+5:30
दोघांनीही परस्पराविरुद्ध तक्रारी दिल्या असून लोणीकंद पोलिसांनी २० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे
पुणे : लोहगावातील पॉश सोसायटीत कुत्र्याने घाण करण्यावरुन दोन कुटुंबांनी परस्पराविरुद्ध विनयभंगाच्या तक्रारी केल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल १२ जणांना अटक केल्याची घटना ताजी असताना पेरणे झोपडपट्टीत कुत्र्याच्या पिल्लावरुन दोन गटात हाणामारी झाली. दोघांनीही परस्पराविरुद्ध तक्रारी दिल्या असून लोणीकंद पोलिसांनी २० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी छाया राजाभाऊ बचुटे (वय ४०, रा. पेरणे झोपडपट्टी) यांनी लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भाऊ लोंढे, निलेश वामणे, मंगल वामणे, बाबु लोंढे, सनी लोंढे, अंट्या लोेंढे, मंगल राखपसरे, अशोक सकट, ज्योती लोंढे, मिना लोंढे, विठाबाई लोंढे व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. भाऊ लोंढे याला अटक केली आहे. आरोपी यांनी कुत्र्याचे पिल्ल्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमा करुन फिर्यादी व फिर्यादींच्या घरच्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. फिर्यादी या पोलीस ठाण्यात तक्रार देण्याकरीत गेल्या असताना पोलीस ठाण्याबाहेर आशीर्वाद हॉटेलचे समोर फिर्यादीस काठीने मारहाण करुन जखमी केले.
याविरोधात मंगल राजू राखपसरे (वय ३०, रा. पेरणे झोपडपट्टी) यांनी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अक्षय बचुटे, संध्या बचुटे, छाया बचुटे, शैला बचुटे, प्रतिक्षा बचुटे, रिना बचुटे, मोन्या बचुटे, गणेश बचुटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अक्षय बचुटे याला अटक केली आहे. फिर्यादी यांचे घरातील पाळलेले कुत्र्याचे पिल्लु आरोपी यांच्या घरात असल्याने फिर्यादीचा मुलगा व भाचा कुत्र्याचे पिल्लु आणण्यासाठी गेल्याने आरोपींनी शिवीगाळ करुन फिर्यादी व फिर्यादीच्या घरच्यांना हाताने मारहाण केली. फिर्यादी या तक्रार देण्यासाठी गेल्या असताना महामार्गालगत फिर्यादी यांना काठीने मारहाण करुन जखमी केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.