"हार न मानता लढले, अन् ७५ वर्षांच्या आईसह कोरोनावर मात करत घरी परतले"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 03:18 PM2021-05-05T15:18:44+5:302021-05-05T15:26:38+5:30
सर्वजण होते एकाच रुग्णालयात दाखल
वाघोली: कोरोना विरूद्ध लढलेल्या एका कुटूंबातील पाच सदस्यांनी ज्येष्ठ आईसह कोरोनावर मात केली आहे. पुणे जिल्ह्यातील बकोरी गावात राहणाऱ्या निसर्गप्रेमी चंद्रकांत वारघडे यांच्या कुटूंबातील पाच जणांना कोरोनाने गाठले. यामध्ये हार न मानता ते लढले आणि ७५ वर्ष वयाच्या आई सह सर्वजण यशस्वी रित्या कोरोनावर मात करत घरी परतले.
''त्रास सुरू झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेच एका पाठोपाठ एक एक असे आम्ही एकाच रुग्णालयात दाखल झालो. यावेळी सर्वांनी घाबरून न जाता एकमेकांना आधार दिला, खूप सकारात्मक विचार ठेवले. त्यामुळे ७५ वर्ष वयाच्या आईसह आम्ही पाचही जण कोरोनामुक्त झालो'', असे वारघडे यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, माझी मुलगी धनश्री हिला प्रथम कोरोनाचा त्रास झाला. ताप अधिक असल्याने कोरोनाचा संशय आला. तिची चाचणी करून लगेच उपचार सुरू केले. मात्र दोन दिवसात त्रास कमी न झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मग घरातील सर्वांच्याच चाचण्या केल्या. त्यानंतर माझी आई, पत्नी, मुलगा या सर्वांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केले. सगळ्यात शेवटी मी दाखल झालो. सर्वजण एकाच रुग्णालयात असल्याने एकमेकांना धीर देत होते. वय जास्त असल्यामुळे आईची जास्त काळजी होती. मात्र मी घरातील कर्ता पुरुष असल्याने काळजावर दगड ठेऊन सर्वांना धीर दिला. आम्ही पाचही जण खूप सकारात्मक विचार करत कोरोनातून मुक्त झालो. आता सर्वजण रुग्णालयातून सुखरूप घरी आलो आहोत.
मुळात अशी वेळ कोणत्याही कुटुंबावर येऊ नये. त्रास जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. घाबरून न जाता खूप सकारात्मक रहा. अन्य कुटुंबीय व मित्रांनीही खूप आधार दिला. यामुळे कोरोनातून मुक्त झालो. सर्वाना कळकळीची विनंती आहे. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंग या त्रिसूत्रीचा वापर करा.''अशा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.