कार्ल्यात मिरवणुकीत मारामारी
By admin | Published: April 14, 2016 02:14 AM2016-04-14T02:14:17+5:302016-04-14T02:14:17+5:30
कार्ला गडावर आई एकवीरेच्या पालखी सोहळ्यापूर्वी मानावरून ठाण्याचे भाविक व पेणचे पालखीचे मानकरी यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याने सोहळ्याला गालबोट लागले.
लोणावळा : कार्ला गडावर आई एकवीरेच्या पालखी सोहळ्यापूर्वी मानावरून ठाण्याचे भाविक व पेणचे पालखीचे मानकरी यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याने सोहळ्याला गालबोट लागले.
आई एकवीरेचा पालखी सोहळा पाहण्यासाठी, तसेच देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो भाविक गडावर आले होते. पालखीचा याची देही याची डोळा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी सायंकाळी ५पासून गर्दी केली होती. गडावर पालखीचा मान हा पुरवापार पेणचे वास्कर व चौलचे आग्राव याचा असताना ठाण्याच्या काही भाविकांनी लाँबिंग करून पालखीचा मान हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्याने पावणेसात वाजता पेणकर व ठाणेकर यांच्यात जोरात हाणामारी झाली. यात पेणकरांनी ठाणेकरांच्या तावडीतून पालखी ताब्यात घेत मिरवणूक सुरू केली. यामुळे चिडलेल्या ठाण्यातील भाविकांनी गडावर गोंधळ घालत स्टेजवर दगडफेक करत स्टेजची तोडफोड करत आँर्केस्टाच्या कलाकारांवर हल्ला चढविला. तसेच काही कँमेऱ्यांची तोडफोड केली, तसेच ट्रस्टच्या वस्तूची मोडतोड करत सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. यामुळे काळ गडावर गोंधळ निर्माण झाला होता. (वार्ताहर)
गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करा
एकवीरा देवीच्या पालखी सोहळ्यात गोंधळ घालत हाणामारी व दंगल घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी कडक कारवाई करा, अशी मागणी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. एकवीरा देवीचा पालखीचा मान पारंपरिक पेणकरांचा आहे. मात्र, मागील ७ ते ८ वर्षांपासून ठाणेकर हा मान हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रस्ट मात्र पेणकरांना हा मान राहावा या भूमिकेत असल्याने ठाणेकरांनी आज गोंधळ घालत ट्रस्टच्या वस्तूची तोडफोड करत हाणामारी व गोंधळ घातला.