अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करणाऱ्या बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा; ‘अंनिस’ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 12:49 PM2023-11-19T12:49:55+5:302023-11-19T12:50:30+5:30

रावणासोबत फोनद्वारे बोलतो, आजार बरे करतो, भूत प्रेते पळवून लावतो, असे दावे बागेश्वर बाबा कार्यक्रमातून करतात

File a case against Bageshwar Baba making superstitious claims Demand for Annis | अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करणाऱ्या बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा; ‘अंनिस’ची मागणी

अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करणाऱ्या बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा; ‘अंनिस’ची मागणी

पुणे : संविधान मूल्यविरोधी अशास्त्रीय, अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे आणि भाष्य करणाऱ्या बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीने पत्रकार परिषदेत केली.

पुण्यात सोमवार ते बुधवार असे तीन दिवस बागेश्वरच्या बाबांचा सत्संग व दरबार कार्यक्रम एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केला आहे. त्याला आमचा तीव्र विरोध असल्याचे ‘अंनिस’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संघटनेचे पदाधिकारी विशाल विमल म्हणाले, अपरिचित व्यक्तीच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी अचूकपणे कागदावर लिहून दाखवतो. लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखतो. रावणासोबत फोनद्वारे बोलतो. आजार बरे करतो. भूत प्रेते पळवून लावतो. लिंबूद्वारे समाधान प्राप्त करून देतो. ईश्वराचा दूत आहे, असे दावे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री बाबा त्यांच्या कार्यक्रमातून करतात. तसेच संतांसंबंधी बदनामीकारक वक्तव्य करतात. हे सगळेच घटनाविरोधी व बेकायदा आहे, असे विमल यांनी सांगितले. संघटनेचे पुणे जिल्हा पदाधिकारी एकनाथ पाठक, पुणे शहर शाखा पदाधिकारी भोसले, प्रतीक पाटील यावेळी उपस्थित होते.

अंनिसने केलेल्या मागण्या

- राज्यघटनेच्या विरोधी दावे व भाष्य करणाऱ्या बाबांवर शासन व्यवस्थेने जादूटोणाविरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक ॲक्ट आणि तत्सम कायद्यांनुसार कारवाई करावी.
- संतांसंबंधी बदनामीकारक, अब्रुनुकसानकारक वक्तव्य भाष्य लक्षात घेऊन त्यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि अन्य तत्सम कायद्यानुसार कारवाई करावी.
- बागेश्वर बाबांच्या दाव्यांविरोधी महा. अंनिस शास्त्रीय माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचे काम करत आहे, त्याला शासन व्यवस्थेने पाठबळ द्यावे.
- बागेश्वर बाबा करत असलेले दावे त्यांनी सिद्ध करण्याचे महा. अंनिसचे आव्हान स्वीकारावे. पुण्यात होत असलेल्या कार्यक्रमाचे व्हिडीओ चित्रण करण्याची सूचना संयोजकांना सरकारने द्यावी.
प्रचलित कायद्यांच्या विसंगत विधाने, भाष्य, वक्तव्ये, इशारे, कृत्य घडल्यास बाबांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी.

Web Title: File a case against Bageshwar Baba making superstitious claims Demand for Annis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.