वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा; चित्रा वाघ यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 01:02 AM2021-02-26T01:02:13+5:302021-02-26T06:54:21+5:30
पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाला, त्या ठिकाणाला चित्रा वाघ यांनी गुरुवारी भेट दिली.
पुणे : “पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात ज्या १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत, त्या ऐकून पोलिसांनी सुमाेटो गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. स्वतः शेण खायचं आणि समाजाला वेठीस धरायचं, ही नवी पद्धत सुरु झाल्याची टीकाही त्यांनी केली.
पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाला, त्या ठिकाणाला चित्रा वाघ यांनी गुरुवारी भेट दिली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. वाघ म्हणाल्या की, आत्महत्येचा प्रकार मध्यरात्री एकच्या सुमारास घडला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास १०० नंबरला याची संपूर्ण माहिती देण्यात आली. ही माहिती राठोडकडून घेण्यात आली होती. पोलिसांनी ही माहिती जाहीर करावी. पूजाचा मृत्यू झाल्यापासून ते सकाळी सातपर्यंत अरुण राठोड याच्या मोबाईलवर कोणाकोणाचे फोन आले, त्यांची चौकशी करावी. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्यावर टीकेची झोड उठवत तपास आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवा, अशी मागणीही त्यांनी केली.
‘गोरगरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील’
“मंत्री वाचला पाहिजे, राज्यातील गोरगरिबांच्या मुली मेल्या तरी चालतील,” असे म्हणत सरकारच्या धोरणावर चित्रा वाघ यांनी टीका केली. राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही. राष्ट्रीय महिला आयोगाला अहवाल पाठवला. वनमंत्री संजय राठोड यांच्या चौकशीशिवाय अहवाल पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे या अहवालाला अर्थ नाही, असे त्या म्हणाल्या.