Shiv Jayanti 2022: पुण्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमात स्पीकरच्या भिंती उभारणाऱ्या मंडळावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 01:35 PM2022-02-21T13:35:55+5:302022-02-21T13:36:14+5:30
शिवजयंतीच्या कार्यक्रमात डीजे लावण्यासाठी पोलीस परवानगी देत नाहीत म्हणून विश्रांतवाडी येथील एका मंडळाने थेट येथील भर रस्त्याच अडवला
येरवडा : कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आल्यानंतर सार्वजनिक सण-उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे सुरू करण्यात आलेले आहेत. महापुरुषांच्या जयंतीसाठी शासनाने यापूर्वीच नियमावली केलेली असून स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी मिळाल्याशिवाय मिरवणूक किंवा स्पीकर लावता येत नाहीत. परंतु पुण्यात विश्रांतवाडी येथील एका मंडळाने शिवजयंती निमित्त पोलिसांची परवानगी नसतानाही स्पीकरच्या भिंती उभारल्या होत्या. त्यामुळे या मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार सुनील टिंगरे व काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यावर स्पीकरच्या भिंती खाली उतरवून कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी शिवजयंतीनिमित्त विश्रांतवाडी येथील एका मंडळाने डीजेसह स्पीकरच्या भिंती उभ्या करत जागेवरच सजावट केली होती. विश्रांतवाडी पोलिसांनी डीजेच्या भिंती उभ्या करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे स्पीकर बंद करून कार्यक्रम थांबवला. मंडळाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट वाहतुकीचा रस्ता मुख्य रस्ताच बंद केला. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डीजेच्या भिंती उभ्या करण्यासाठी परवानगी नसल्यामुळे स्पीकर बंद करावा लागेल असा पवित्रा पोलिसांनी घेतला होता. तर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत इतर सर्व काही "आलबेल" असताना त्याकडे पोलिस लक्ष देत नाहीत, फक्त शिवजयंतीच्याच कार्यक्रमासाठी स्पीकर व डीजेला परवानगी का दिली जात नाही? असा संतप्त सवाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला
या सर्व परिस्थितीमुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यस्थी करीत मंडळाचे कार्यकर्ते व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये समन्वय घडवून आणला. महापुरुषांच्या जयंत्या तसेच मिरवणुका नियमानुसार झाल्याच पाहिजेत. परवानगीसाठी काही अडचण असेल तर या पुढील काळात मी स्वतः पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करीन. पोलीस परवानगी घेऊन सर्व जयंत्या व सण-उत्सव या पुढील काळात देखील उत्साहात साजरे करण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.