विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:08 AM2021-04-26T04:08:55+5:302021-04-26T04:08:55+5:30
घरभाडे, वीज बिल भरण्यासाठी साठवलेले पैसे पतीने गुपचूप दारु पिण्यामध्ये उडवले लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमविवाहानंतर पतीला दारुचे ...
घरभाडे, वीज बिल भरण्यासाठी साठवलेले पैसे पतीने गुपचूप दारु पिण्यामध्ये उडवले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रेमविवाहानंतर पतीला दारुचे व्यसन असल्याने संसारात वादावादी सुरु झाली. घरभाडे, वीज बिल भरण्यासाठी साठवलेले पैसे पतीने गुपचूप दारु पिण्यामध्ये उडवल्याने असह्य होऊन पत्नीने पेटवून घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. अंकिता कुंदन कांबळे (वय २५, रा. उंड्री) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. कुंदन कांबळे (वय २९, रा. उंड्री) असे पतीचे नाव आहे. याप्रकरणी अंकिताचे वडिल व्यंकट जाधव (वय ५२, रा. कृपानगर, उंड्री) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
कुंदन आणि अंकिता यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यांना एक दीड वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी कुंदनला दारुचे व्यसन लागले. कुंदन दररोज दारुच्या आहारी जाऊ लागला. त्यामुळे घरातील सामानासाठी अंकिताला पैसे साठवून ठेवावे लागत होते.
घरभाडे, वीज बिल भरण्यासाठी अंकिता पैसे साठवून ते कुंदनपासून लपवून ठेवत असे. मात्र, १२ एप्रिल रोजी अंकिताने घरभाडे व वीज बिलासाठी ठेवलेले पैसे कुंदनने गुपचुप घेतले. त्या पैशातून तो दारु पिऊन घरी आला. त्याचा राग आल्याने अंकिता आणि कुंदन यांच्यात वादावादी झाली. त्या रागाच्या भरात अंकिता हिने अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना २४ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता तिचा मृत्यू झाला. कोंढवा पोलिसांनी कुंदन कांबळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे अधिक तपास करीत आहेत.