Anti Corruption Bureau: लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 07:55 PM2021-11-17T19:55:32+5:302021-11-17T19:56:39+5:30
बक्षीसी रजिस्ट्री करण्यासाठी लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधक महिलेविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे
पुणे : बक्षीसी रजिस्ट्री करण्यासाठी लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधक महिलेविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. लीना संगेवार (दुय्यम निबंधक, सह दुय्यम निबंधक, हवेली क्रमांक ८) असे त्यांचे नाव आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्या नावावरील लोहगाव येथील साडेनऊ गुंठ्याच्या प्लॉटच्या कागदपत्रांवर तक्रारदार यांची बहीण यांचे हक्कसोड पत्राची रजिस्ट्री करायची होती. त्यानंतर ते तक्रारदार व तक्रारदार यांच्या आईच्या नावे बक्षीसपत्राची रजिस्ट्री करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. या कामासाठी लीना संगेवार यांनी प्रथम ३० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची २० सप्टेबर रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात लीना संगेवार यांनी तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर सापळा कारवाई होऊ शकली नाही. लाचेची मागणी करण्यात आली असल्याने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद गोर्डे अधिक तपास करीत आहेत.