Mahavitaran: दौंडमधील 'या' दुग्ध उत्पादक संस्थेने केली तब्बल दीड कोटींची वीजचोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 06:00 PM2022-01-13T18:00:25+5:302022-01-13T18:03:23+5:30
राजहंस दुग्ध उत्पादक संस्था असून, दुधावर प्रकिया करुन त्याचे उपपदार्थ बनविण्याचा त्यांचा उद्योग आहे
बारामती : वीजमीटरमध्ये फेरफार करुन तब्बल ५ वर्षांपासून वीजचोरी करणाऱ्या गलांडवाडी (ता. दौंड) येथील मे. राजहंस दुग्ध उत्पादक संस्थेवर महावितरणच्या भरारी पथकाने दीड कोटी रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा यवत पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
गलांडवाडी (ता. दौंड) येथे मे. राजहंस दुग्ध उत्पादक संस्था असून, दुधावर प्रकिया करुन त्याचे उपपदार्थ बनविण्याचा त्यांचा उद्योग आहे. त्याकरिता महावितरणकडून त्यांनी औद्योगिक वापराची वीजजोडणी घेतलेली आहे. याच वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी होत असल्याची माहिती वीज कंपनीला मिळाली. त्यानुषंगाने महावितरणच्या बारामती येथील भरारी पथकाने डिसेंबर महिन्यात तपासणी केली. सकृतदर्शनी वीजमीटरचे सील तोडून फेरफार केल्याचे दिसून आले. तेंव्हा संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संदीप शितोळे यांच्या समक्ष पंचनामा करुन वीजमीटर तपासणीसाठी बारामती येथील चाचणी विभागात आणण्यात आले. तेथेही शितोळे यांच्या समक्ष तपासणी केली. त्यानंतर ज्या कंपनीने ते वीजमीटर बनविले आहे, त्या कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावून मीटरचा ‘एमआरआय’ काढण्यात आला.
मीटरचा ‘एमआरआय’ काढल्यानंतर सदर मीटरमध्ये १० ऑगस्ट २०१६ पासून ९ डिसेंबर २०२१ (मीटर ताब्यात घेईपर्यंत) तब्बल ६४ महिने वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले. वीजचोरीच्या कालावधीत २४ लाख ७५ हजार १६८ इतका वीजवापर होणे अपेक्षित होते. परंतु, जादा वापराच्या काळात मीटर बंद करुन फक्त १६ लाख १५ हजार ६९ इतकाच वीजवापर होऊ दिला. परिणामी ८ लाख ६० हजार ९९ इतक्या युनीटची नोंद मीटरमध्ये झाली नाही. चोरी केलेल्या या युनीटपोटी १ कोटी ३३ लाख ७८ हजार ६२० व विद्युत कायद्यातील तरतुदीप्रमाणे तडजोड शुल्कापोटी १६ लाख २० हजार असे १ कोटी ४९ लाख ९८ हजार ६२० रुपयांचे देयक ग्राहकाला देण्यात आले. मात्र विहीत मुदतीत ग्राहकाने ही रक्कम भरली नसल्याने प्रथम बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन तो यवत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
ही वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी परिक्षेत्राचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांचे मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक कोथले, सहाय्यक अभियंता महेश कटारे, सहा. सुरक्षा अधिकारी नागनाथ कोरे व संदीप मंडले, वरिष्ठ तंत्रज्ञ विनोद देवणे व जयकुमार गावडे यांनी परिश्रम घेतले.