सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमधीव राडारोडाप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:07 PM2017-12-15T12:07:10+5:302017-12-15T12:11:20+5:30
पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे राडारोडा टाकल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुरुवारी चत:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे राडारोडा टाकल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुरुवारी चत:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ज्या कर्मचाऱ्याने पैसे घेऊन हा राडारोडा विद्यापीठात टाकायला लावला त्याच्याविरुद्ध अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बुधवारी दुपारी राडारोडा भरलेले ७ ट्रक गस्तीवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी पकडले होते. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अजित जाधव (वय ४०, रा. मॉडेल कॉलनी) व ७ ट्रक चालकांविरुद्ध कलम ४२६, ४३१, ४४७, १०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गोखलेनगर येथील म्हाडा कॉलनीतील राडारोडा विद्यापीठ कॅम्पसमध्ये टाकण्यासाठी आणण्यात आला होता. विद्यापीठातील एका कर्मचाºयाने पैसे घेऊन हा राडारोडा टाकण्यास लावल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी स्थावर विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी कोणताही राडारोडा मागविला नसल्याचे तसेच त्या ७ ट्रकशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले होते. सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. शिंदे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
विद्यापीठात राडारोडा कोणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आला हे बुधवारीच निष्पन्न झाले असताना, त्या कर्मचाºयाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देण्याचे विद्यापीठाने टाळले आहे. आम्ही अजून त्याचा शोध घेत असून, एक-दोन दिवसात त्याचा छडा लावू, अशी भूमिका विद्यापीठाकडून घेण्यात आली आहे.
सहभागी कर्मचाऱ्यांना निलंबित करा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राडारोडा टाकल्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करा अशी मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर, परिवर्तन संस्थेचे अनिकेत राठी यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली आहे.
कोणालाही पाठीशी घालणार नाही
विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडून राडारोडा टाकल्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. एक-दोन दिवसात त्याचा शोध लावू. विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी काही फेरबदल करण्यात येत आहेत.
- सुरेश भोसले, संचालक, सुरक्षा विभाग
कोणालाही पाठीशी घालणार नाही
विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडून राडारोडा टाकल्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. एक-दोन दिवसात त्याचा शोध लावू. विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी काही फेरबदल करण्यात येत आहेत.
- सुरेश भोसले, संचालक, सुरक्षा विभाग