राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:35 PM2020-01-09T15:35:33+5:302020-01-09T15:54:14+5:30
राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह ११ व्यक्तीवर शिवाजीराव सहकारी बँकेच्या ऑडिटमधील फसवणूक प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे :राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह ११ व्यक्तीवर शिवाजीराव सहकारी बँकेच्या ऑडिटमधील फसवणूक प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयी योगेश लकडे (वय २९, रा.आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. भोसले हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार शिवाजीराव भोसले बँकेचे २०१८-१९चे ऑडिट करण्यात आले. त्या ऑडिट दरम्यान या वर्षांच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून, त्या खऱ्या भासवून ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार ७२३ कोटी रक्कम कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही फसवणूक मानून भोसले यांच्यासह बँक ऑफिसर शैलेश भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तू पडवळ, विष्णू तुकाराम जगताप, हनुमान बबनराव सोरते यांच्यासह इतर ११ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीराव भोसले बँकेकडून खोटा अहवाल
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ' अनिल भोसले हे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.या बँकेचे ऑडिट करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले होते. त्यानुसार चार्टड अकाउंटंट लकडे यांनी केलेल्या तपासणीत ही अनियमितता आढळून आली.