Pune: फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात एक्सर्बिया डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 03:05 PM2021-12-06T15:05:44+5:302021-12-06T15:14:02+5:30
एकूण ४५ लाख ९२ हजार २३६ रुपये फिर्यादी यांना न देता संचालकांनी फिर्यादी यांचा विश्वासघात करुन या रक्कमेचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरली...
पुणे : प्रोजेक्टच्या कामाची वर्कऑर्डर देऊन त्याप्रमाणे काम करुन घेतल्यानंतरही बिलाची पूर्ण रक्कम न देता विश्वासघात करुन ४५ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी एक्सर्बिया डेव्हलपर्स कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. विशाल नहार, राहुल नहार (दोघे रा. मार्केटयार्ड), सचिन पाटील, नितीन सैद अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीपाल सुनिल धाडीवाल (वय ३४, रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१५ ते २०१६ दरम्यान घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सर्बिया डेव्हलपर्सच्या संचालकांनी फिर्यादी यांच्या डावी भुसारी कॉलनीतील कार्यालयात घेऊन वरई, माडप, आंबी व ताडवाडी येथील प्रोजेक्टच्या कामाची वर्कऑर्डर देऊन वर्कऑर्डरप्रमाणे काम झाले की, त्वरीत ठरलेली रक्कम दिली जाईल, असे संचालकांनी विश्वास दिला. फिर्यादी यांचेकडून वर्कऑर्डरप्रमाणे काम करुन घेतले. काम केलेल्या बिलाची रक्कम ११ लाख ९६ हजार ४८ रुपये व प्रोजेक्टचे काम केल्यानंतर पूर्ण बिलाचे रक्कमेतून रिटेन्शन मनी म्हणून स्वत:कडे ३३ लाख ९६ हजार १८८ रुपये ठेवले. एकूण ४५ लाख ९२ हजार २३६ रुपये फिर्यादी यांना न देता संचालकांनी फिर्यादी यांचा विश्वासघात करुन या रक्कमेचा वापर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरली.
तसेच फिर्यादी यांची ४५ लाख ९२ हजार २३६ रुपये एवढ्या रक्कमेची आर्थिक फसवणूक करुन ग्राहकांकडून प्रोजेक्ट करीता घेतलेल्या रक्कमेचा त्या प्रोजेक्टचे कामाकरीता न करता इतरत्र वापरुन विश्वासघात केला. याप्रकरणी श्रीपाल धाडीवाल यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार कोथरुड पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप अधिक तपास करीत आहेत.