तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:17 AM2021-02-06T04:17:38+5:302021-02-06T04:17:38+5:30
मंचर पोलिसांनी पूर्वभागात अवैध दारू व गुटखा विक्रीवर कारवाई करत यापूर्वी कानसकर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस ...
मंचर पोलिसांनी पूर्वभागात अवैध दारू व गुटखा विक्रीवर कारवाई करत यापूर्वी कानसकर याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी आवाहन केले होते की हरीश कानसकर याने आरटीआय कार्यकर्ता व माहितीचा अधिकार कायद्याची भीती दाखवून खंडणी वसूल केली आहे. याबाबत कोणाची तक्रार असल्यास मंचर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. या आवाहनास प्रतिसाद मिळून तिघांनी कानसकर यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी दिली. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी ते २७ जानेवारी व मागील आठ ते नऊ महिन्यांदरम्यान थोरांदळे गावच्या हद्दीत मुरूम उपसा चालू असल्याचे पाहून कानसकर याने मोबाइलमध्ये शूटिंग करून ५० हजार रुपयांची मागणी केली होती.
३ सप्टेंबरपासून ९ डिसेंबरदरम्यान नागापूर गावच्या हद्दीत भावांमध्ये आईने करून दिलेल्या मृत्युपत्रावरून वाद सुरू होता. हा वाद सोडविण्यासाठी मी पाषाण रोड एसपी ऑफिसचा विशेष पोलीस अधिकारी व माहितीचा अधिकारी म्हणून काम करत आहे. मी तुम्हाला मदत करतो, असे म्हणत २५ हजार रुपये घेतले.
आणखी एका घटनेत हॉटेल चालू ठेवण्यासाठी दर महिन्याला एक हजार रुपये हप्ता द्यावा, अशी मागणी करून पाच हजारांचा हप्ता घेत असल्याची तक्रार हॉटेल चालकांनी केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करत आहेत.