डीआयजींवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 05:31 AM2019-12-27T05:31:11+5:302019-12-27T05:31:30+5:30
पनवेल : खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे एम.टी. विभागात डीआयजी पदावर कार्यरत असलेले निशिकांत मोरे यांच्यावर पोस्कोअंतर्गत तळोजा ...
पनवेल : खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे एम.टी. विभागात डीआयजी पदावर कार्यरत असलेले निशिकांत मोरे यांच्यावर पोस्कोअंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन मुलीबरोबर अश्लील वर्तन केल्यासंदर्भात मुलीच्या कुटुंबीयांनी मोरे यांच्याविरोधात तक्रार केली.
मोरे यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी तळोजा आणि खारघर पोलीस ठाण्यात गेल्यावर तक्रार दाखल करून घेतली नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी अलीकडेच खारघरमध्ये पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे यावेळी मुलींना वडिलांनी सांगितले. तळोजा वसाहतीत वास्तव्यास असलेले, विकासक असलेले पीडित मुलीचे वडील आणि डीआयजी निशिकांत मोरे यांची आठ वर्षांपूर्वी खारघरमध्ये ओळख झाली होती. मोरे यांनी त्यांच्याकडून दुकान गाळे विकत घेतले होते. काही पैसे रोख देऊन गाळ्याचा ताबा घेऊन उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तक्रारदाराने आॅगस्ट महिन्यात पोलिसांकडे लेखी स्वरूपात केला होता. दरम्यान, जून महिन्यात १७ वर्षांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी निमंत्रण नसतानाही मोरे घरी आले. केप कापून मुलीच्या गालावर आणि शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. याप्रकरणी गुरूवारी गुन्हा दाखल केल्याचे तळोजा पोलिसांनी सांगितले.