लोणी काळभोर येथे मतदान केंद्रावर मोबाईल द्वारे चित्रीकरण, एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 07:16 PM2019-04-30T19:16:12+5:302019-04-30T19:23:12+5:30
निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात चित्रीकरण करण्यास बंदी घातलेली असतानाही मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोणी काळभोर : निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात चित्रीकरण करण्यास बंदी घातलेली असतानाही शिरूर लोकसभा मतदारसंघातील थेऊर ( ता. हवेली ) येथील केंद्रात मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय आदेशाचे उल्लंघन केले म्हणून चित्रीकरण केलेल्या व्यक्तिवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , याप्रकरणी अशोक केशव देशमुख ( वय ४८, रा. मु. पो. नळवणे, ता. जुन्नर, जि. पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण रामभाऊ काकडे ( रा. थेऊर, ता. हवेली ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख हे जुन्नर तालुक्यातील खटकाळे येथे असलेल्या शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळेत प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांची लोकसभा निवडणुकीत थेऊर येथील केंद्र क्रमांक ३१३ येथे केंद्राध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तसेच त्यांंच्यासोबत सहकारी म्हणून शितल सुरेश गोरे, आनंद नारायण संत, नारायण बबन पडवळ, दत्तात्रय रामदास शिंदे व बिरा मारूती गुलदगड यांची नेमणूक करण्यात आली होती.
मतदानाच्या दिवशी २९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारांस मतदार यादीतील क्रमांक १२५ मधील मतदार किरण काकडे हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आला. यावेळी त्याने त्याने मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असूनही व मतदान प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात चित्रीकरण केले. यांमुळे सरकारी आदेशाचे उल्लंघन व मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाला. म्हणून देशमुख यांनी त्यांचेविरोधात फिर्याद दिली आहे.