मतपत्रिका स्वत: देण्यावर भर
By admin | Published: March 3, 2016 01:40 AM2016-03-03T01:40:37+5:302016-03-03T01:40:37+5:30
मतपत्रिका पळविणे, बोगस मतपत्रिका, या गोष्टींमुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला गेल्या काही वर्षांपासून ‘राजकीय’ रंग चढला आहे
पुणे : मतपत्रिका पळविणे, बोगस मतपत्रिका, या गोष्टींमुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला गेल्या काही वर्षांपासून ‘राजकीय’ रंग चढला आहे. यंदा निवडणूक प्रक्रियेला ‘शिस्त’ लावण्यात आली असल्याने मतपत्र्किा स्वत: देण्याकडे मतदारांचा कल असल्याचे दिसून येत आहे.
मसाप निवडणूक कि ंवा साहित्य संमेलन अध्यक्ष निवडणुकीत नेहमी गोंधळाचे वातावरण असते. मतपत्रिका एकगठ्ठा आणून दिल्या जातात. पण, या निवडणुकीत मतपत्रिकांचा गोंधळ होण्याचे प्रमाण जवळपास नगण्य आहे. त्यामुळे मतदारांकडून मतपत्रिका पाठविण्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे. परंतु या काहीशा कडक धोरणामुळे उमेदवारांची मात्र पंचाईत झाली आहे.
गतवेळची मसापची निवडणूक ही मतपत्रिकांची पळवापळवी, बोगस मतपत्रिकांमुळे गाजली. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये आणि मतदारांचा निवडणूकप्रक्रियेमध्ये थेट सहभाग वाढावा, या उद्देशाने यंदा प्रथमच निवडणूकप्रक्रियेचे धोरण काहीसे कडक करण्याबरोबरच त्याला ‘शिस्त’ लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मतपत्रिकेला बारकोड लागू करण्याबरोबरच मतदारांनी मतपत्रिकेबरोबरच ओळखपत्र सादर करणे आणि मतपत्रिकेला पोस्ट क्रमांक देणे या गोष्टींमुळे मतदानप्रक्रिया अधिक पारदर्शक ठरली आहे. त्यामुळे मतपत्रिका पाठविण्याचा ओघ वाढत आहे.
बाहेरगावचे प्रतिनिधी स्वत: मतपत्रिका आणून देत असले, तरीही ज्या व्यक्तीने आणून दिले तिचे नाव, पत्ता याची नोंद ठेवली जात आहे. उमेदवारांविरुद्ध तक्रार किंवा बोगस मतपत्रिका आढळल्या, तर कडक कारवाई केली जाणार आहे. राज्यात ११ हजार मतदार आहेत. आजमितीला अंदाजे दीड ते दोन हजार मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. शेवटच्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे निवडणूक अधिकारी परदेशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)