अग्निशमन दलातील रिक्त जागा तातडीने भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:11 AM2021-01-22T04:11:56+5:302021-01-22T04:11:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के जागा रिक्त आहे. तीन वर्षांपासून भरतीसाठीची नियमावली मंजूरीसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के जागा रिक्त आहे. तीन वर्षांपासून भरतीसाठीची नियमावली मंजूरीसाठी नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे़ या प्रश्नी तातडीने विभागाच्या प्रधान सचिवांना नियमावली मंजूर करण्याचे आदेश द्यावेत व तीन वर्षे विनाकारण ही मंजुरी प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी विनंती सजग नागरिक मंचने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे़
याबाबत दिलेल्या निवेदनात मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका अग्निशमन दलात सुयोग्य व पुरेसे कर्मचारी असणे आवश्यक आहे. अग्नीशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली राज्यातील अग्नीशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार करून, नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. यास तीन वर्षे झाली तरी ती अद्याप मंजूर झालेली नाही़ याचा परिणाम म्हणून पुणे महापालिकेच्या अग्नीशमन दलातील भरती रखडली आहे. आजमितीला अग्नीशमन दलातील मंजूर ९१० पदांपैकी ५१० पदे रिक्त आहेत. पुणे शहराचा विस्तार आणि शहराची सुरक्षितता विचारात घेता या सेवेतील पदे दीर्घकाळ रिक्त ठेवणे अडचणीचे असल्याचे पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी सातत्याने नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना कळवूनही मंत्रालयाकडून निर्णय घेतला जात नाही हे दुर्दैव असल्याचे कळविले आहे़ तसेच नगरविकास मंत्रालय थेट मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत असल्याने आपण तातडीने विभागाच्या प्रधान सचिवांना ही नियमावली मंजूर करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे़