मुख्य रस्त्यावरच भरते मंडई

By admin | Published: July 7, 2017 03:26 AM2017-07-07T03:26:02+5:302017-07-07T03:26:02+5:30

स्वतंत्र जागा नसल्याने नेहरूनगरमध्ये मंडई मुख्य रस्त्यावरच भरत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Fill the main road on the yard | मुख्य रस्त्यावरच भरते मंडई

मुख्य रस्त्यावरच भरते मंडई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नेहरूनगर : स्वतंत्र जागा नसल्याने नेहरूनगरमध्ये मंडई मुख्य रस्त्यावरच भरत आहे. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. मासूळकर कॉलनीमध्ये अद्ययावत मंडई असूनदेखील फक्त एकच दिवस मंडई भरते, तर संत तुकाराम नगरमध्ये मंडई मद्यपींचा अड्डा बनली आहे.
येथील संतोषी माता चौक ते श्रीजी कॉम्प्लेक्स चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फळे, भाजी, खाद्यपदार्थ विक्रेते, तसेच इतर व्यावसायकांनी अतिक्रमण केले असून, त्यामुळे चालकांना वाहन चालविताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नेहरु चौकात तर पदपथावरही भाजी-फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरूनच जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे.
सायंकाळी या चौकात वाहतूककोंडी नेहमीची झाली आहे. याच चौकात बस थांबादेखील आहे. बसचालकांनाही रस्त्याच्या एका बाजूला बस घेण्यासाठी कसरत करावी लागते. प्रवाशांना उतरताना-चढताना त्रास सहन करावा लागतो. क्रांती चौकातही हीच परिस्थिती आहे. सायंकाळी भाजीविक्रेते व इतर व्यापाऱ्यांनी रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण केले असल्यामुळे या रस्त्यावरदेखील अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमणविरोधी विभागाचे कर्मचारी कारवाईसाठी येतात; मात्र कारवाईचा देखावाच केला जातो. ठोस कारवाई कोणावरही होत नाही. त्यामुळे अतिक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. वाढत्या अतिक्रमणावर तोडगा काढण्यासाठी या भागात मंडई उभारावी, अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.
मासूळकर कॉलनी येथील रसरंग चौक ते मोरवाडी म्हाडा चौकापर्यंत रस्त्यावर जागोजागी विविध विक्रेत्यांसह येथील रहिवाशांनी रस्त्यालगत असलेल्या इमारतींमधील वाहनतळाच्या जागेत दुकाने
थाटून अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्ता दुभागला जात असून, वाहनचालक व पादचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा या रस्त्यावर अपघातदेखील घडलेले आहेत.
विशेष म्हणजे या भागात मंडई असतानादेखील विक्रेते या मंडईचा उपयोग करीत नाहीत. या प्रभागामध्ये महापालिकेने लाखो रुपये खर्चून बांधलेली मंडई वापराअभावी कित्येक वर्षांपासून बंद होती. मात्र वर्षभरापासून या ठिकाणी आठवडा बाजार भरवला जात आहे. त्यामुळे आठवड्यात फक्त एकच दिवस या ठिकाणी मंडई भरते. इतर वेळी या जागेचा उपयोग क्रिकेट खेळण्यासाठी केला जात आहे. मंडईलगतच्या हॉकर्स झोनची जागादेखील धूळखात पडून आहे.

संत तुकारामनगर : मद्यपींचा होतोय त्रास
संत तुकारामनगर परिसरात देखील महापालिकेने मोठी, गोलाकार मंडई बांधलेली असून, या मंडईमध्ये भाजीविक्रेते कमी मात्र इतर व्यावसायिकच जास्त आहेत. त्याचबरोबर ही मंडई अनेक तरुणांसाठी सिगरेट-दारू पिण्याचा अड्डा बनली आहे. महेशनगर ते संत तुकारामनगर परिसरात देखील जागोजागी वाहनांमधून, तर कुठे हातगाडीवर भाजीविक्रेते भाजी विक्री करतात. रस्त्यावर कोठेही ते उभे राहत असल्यामुळे इतर चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मंडईसाठी बांधलेल्या इमारती धूळखात पडून आहेत. त्याठिकाणी मद्यपींचा वावर वाढला आहे. पोलिसांनी या ठिकाणी बसणाऱ्या मद्यपींवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मंडईच्या इमारतीचा दुरुपयोग सुरू आहे.

Web Title: Fill the main road on the yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.