तलाव भरा ! इंदापूर, दौैंड तालुक्यातून मागणी वाढली
By admin | Published: April 21, 2017 05:58 AM2017-04-21T05:58:41+5:302017-04-21T05:58:41+5:30
तलावातील लाभक्षेत्रात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीतील ऊस, भाजीपाला, चारापिके आणि फळबागांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
शिर्सुफळ : येथील तलावातील लाभक्षेत्रात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीतील ऊस, भाजीपाला, चारापिके आणि फळबागांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाण्यावाचून पिके जळू लागली आहेत.
हा तलाव खडकवासलातून कालव्यातून भरून घेण्यासठी तलावात पाणी सोडण्याची येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. परिसरातील विंधन विहिरी, विहारी कोरड्या पडल्याने लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिर्सुफळ गावची यात्रा सुरू होत आहे. शिर्सुफळ येथील शिरसाई यात्रेसाठी आजूबाजूच्या परिसरातील भाविकभक्त हजारोंच्या संख्येने शिरसाई देवीचा नवस फेडण्यासाठी येत असतात. त्यामुळे पाण्याची मोठी टंचाई निर्माण होऊ शकते. पाणी सोडण्याची मागणी शिर्सुफळ ग्रामपंचायतीचे सरपंच अतुल हिवरकर, आप्पासाहेब आटोळे, बारामती दूध संघाचे संचालक नितीन आटोळे, विश्वास आटोळे व शिर्सुफळ येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
(वार्ताहर)
राहू : टँकर मिळेना, तलावात पुरंदर उपसा योजनेचे पाणी तरी सोडा, अशी कळकळीची विनंती दौंड तालुक्यातील ताह्मणवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे. पाणी तलावात सोडले तर पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
हा परिसर गेल्या कित्येक वर्षांपासून तहानलेलाच असतो. ऐन उन्हाळ्यात तर टँकरने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसाबसा सोडवला जातो. यावर्षी अद्याप पिण्याच्या पाण्यासाठी टँकरही मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत दौंडचे गटविकास अधिकारी संतोष हराळे म्हणाले, की ताह्मणवाडी येथील पिण्याच्या पाण्याबाबतचा टँकरचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. त्याबाबत कार्यवाही होऊन लवकरच येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल.
दौंड पंचायत समितीचे उपसभापती सुशांत दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता, येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. लवकरच येथे टँकर दिला जाईल. पुरंदर उपसा योजनेचे पाणी ताह्मणवाडी तलावात सोडण्यासाठी साधारणता दोन कोटी रुपय खर्च अपेक्षित आहे. यासाठी पाटबंधारे खात्याने अंदाजित आराखडा काही वर्षांपूर्वी तयार केला आहे. परंतु त्यावर कार्यवाही झाली नाही. (वार्ताहर)