पुण्यातील खड्डे २४ तासात बुजवा; चार कनिष्ठ अभियंत्यांना अतिरिक्त आयुक्तांची नोटीस
By निलेश राऊत | Published: July 20, 2023 07:03 PM2023-07-20T19:03:12+5:302023-07-20T19:03:19+5:30
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
पुणे : एक, दीड फूट खड्डा पडूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी पथ विभागाच्या चार कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटिस देण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी संबंधित खात्याची चांगलीच झाडाझाडती घेतली होती. या पार्श्वभूमीवर गुरूवारी ढाकणे यांनी पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, बालेवाडी, कर्वेरस्ता, कोथरूड, नळस्टॉप, मित्र मंडळ चौक, लक्ष्मीनारायण चौक आदी ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी ज्या चार ठिकाणी मोठे मोठे खड्डे आढळून आले आहेत, त्या ठिकाणच्या कनिष्ठ अभियंत्याला कारणे दाखवा नोटिस देण्याचा निर्णय ढाकणे यांनी घेतला आहे. तसेच हे खड्डे २४ तासात बुजविण्याचे आदेशही दिले आहेत.
दरम्यान बालेवाडी ते सिमला ऑफिस चौक या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या सात दिवसात पूर्ण करण्यात येईल. तसेच या मार्गावर असलेल्या चेंबरचीही दुरूस्ती करून सर्व रस्ता दुरूस्त केला जाईल असेही ढाकणे यांनी सांगितले. या कामाची बीले पीएमआरडीएकडून वसुल करण्यात येणार आहेत.