'रिक्त पदे भरा', राज्य कृषी लिपिक संघटनेचे पुण्यात बुधवारी धरणे आंदोलन
By नितीन चौधरी | Published: May 8, 2023 03:20 PM2023-05-08T15:20:56+5:302023-05-08T15:21:04+5:30
लिपिक पदे कमी न करणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नती देणे, सेवाप्रवेशोत्तर परीक्षा घेणे मागण्या मान्य न झाल्यास २२ मेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा
पुणे : लिपिक पदे कमी न करणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नती देणे, सेवाप्रवेशोत्तर परीक्षा घेणे अशा विविध मागण्यासंदर्भात न्याय मिळत नाही. याबाबत लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (दि. १०) महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेतर्फे कृषी आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष जाकीर हुसेन मुलाणी यांनी दिली. मागण्या मान्य न झाल्यास २२ मेपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
मुलाणी म्हणाले, विविध मागण्यांबाबात संघटनेने अनेक वेळा निवेदन दिले आहे. संघटनेने कृषी विभागाच्या लिपिक संवर्गांचा प्रस्तावित आकृतिबंध तयार करून कृषी आयुक्तालयात वेळोवेळी सादर केलेला आहे. त्यात लिपिकवर्गीय पदे कपात करू नये, अशी मागणी केलेली आहे. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने संघटनेने राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना निवेदन पाठवून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनानंतरही सरकारने लक्ष न दिल्यास २२ मेपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.