क्या बात है! बारामतीच्या 'लता करे' यांच्यावर आधारित चित्रपटाची राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 04:12 PM2021-03-23T16:12:45+5:302021-03-23T16:27:03+5:30
पतीच्या उपचारासाठी अनवानी पायाने धावत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या बारामतीच्या ६६ वर्षीय लता करे यांच्या जीवनसंघर्षावर आधारित ‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
बारामती : पतीच्या उपचारासाठी अनवानी पायाने धावत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या बारामतीच्या ६६ वर्षीय लता करे यांच्या जीवनसंघर्षावर आधारित ‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
लताबाई मूळच्या बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकरच्या. मोलमजुरीच्या जोरावर तीन मुलींची लग्न लावून दिली. आता हाताला काम शोधण्यासाठी बारामतीत आल्या आणि बारामतीकर झाल्या. त्यांच्या संघर्षावर आधारित चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नविन देशबोनाई यांनी दिग्दर्शित केलेल्या वास्तव घटनेवर आधारित या
चित्रपटात लता करे यांनीच मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात त्यांचे पती भगवान करे, मुलगा सुनील करे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. या दोन्ही व्यक्तिरेखा या दोघांनीच साकारल्या आहेत. तसेच चित्रपटात रेखा गायकवाड, राधा चव्हाण, अजय शिंदे, बालकलाकार साक्षी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रशांत महामुनी यांचे संगीत असून पार्श्वसंगीत कन्नू समीर यांनी दिले आहे. 'एक मुंगी सुद्धा प्रचंड समुद्र पार करून जाऊ शकते आणि हे सामर्थ्य तुमच्यातही आहे. फक्त स्वत: ला ओळखण्याचा अवकाश आहे,असे लता करे सांगतात.
वयाच्या मर्यादा ओलांडत नियतीवर मात केलेल्या सामान्य महिलेच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा असलेला ‘लता भगवान करे’ हा चित्रपट १७ जानेवारी २०२० साली प्रदर्शित झाला होता.
लताबाई मूळच्या बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकरच्या. मोलमजुरीच्या जोरावर तीन मुलींची लग्न लावून दिली.हाताला काम शोधण्यासाठी बारामतीत आल्या.
त्यांचे पती भगवान करे हे हृदय विकाराच्या आजाराने अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या उपचारासाठी थोडा पैसा मिळावा म्हणून लताबाईंनी बारामती मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि नऊवारी साडीमधली ही ६६ वर्षांची बाई कडाक्याच्या थंडीत कुठल्याही स्पोर्टशूज शिवाय धावली. आणि सलग तीन वर्षे लता करे यांनी ही स्पर्धा जिंकली होती.
—————————————