विद्यापीठात मिळणार चित्रपट साक्षरतेचे धडे.....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:58 PM2018-05-31T19:58:32+5:302018-05-31T19:58:32+5:30
विद्यापीठातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज या विभागातर्फे येत्या जुलैपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
पुणे: चित्रपटाला केवळ पॅशन पुरतच मर्यादित न ठेवता त्याची निर्मिती प्रक्रिया...त्याची विविध अंग अभ्यासायची इच्छा आहे अशा चित्रपटप्रेमींसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘डिप्लोमा इन इंडियन फिल्म’ असा एक स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. दिल्ली, हैद्राबाद आणि जाधवपूर नंतर आता पुण्यात हा चित्रपटविषयक अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. विद्यापीठात प्रथम होणा-या या प्रयोगासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने मोलाची भूमिका बजावली आहे.
ज्यांना भारतीय चित्रपटांच्या अभ्यासात शैक्षणिक करिअर करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी विद्यापीठातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज या विभागातर्फे येत्या जुलैपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) अभ्यासक्रम असून,सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक अशा दुहेरी अभ्यासाचा त्यात समावेश आहे. प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नुकतीच सुरू झाली आहे.
या अभ्यासक्रमाविषयी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे भारतीय चित्रपटांचा अमूल्य असा ठेवा आहे. ग्रंथालय, सुसज्ज थिएटर संग्रहालयाकडे आहे. या सुविधा विद्यार्थ्यांना चित्रपटांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगात येऊ शकतील, यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न करीत होतो. एखाद्या अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी भेटून चर्चा केली. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर यंदापासून हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांची एक फळी घडेल आणि चित्रसाक्षरतेच्या दृष्टीकोनातून एक चळवळ उभी राहील. लवकरच दोन्ही संस्थांमध्ये औपचारिक सांमजस्य करार केला जाणार आहे.
हा अभ्यासक्रम एका वर्षात दोन सत्रांत विभागलेला असेल. विविध शिष्यवृत्ती योजनांचा समावेश यात राहाणार असून, प्रवेश परीक्षेनंतर एकूण २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पसुद्धा करावा लागणार असून, ऐच्छिक विषयसुद्धा निवडता येणार आहे. याशिवाय 'एनएफएआय'मध्ये जाऊन चित्रपट जतन करण्याचे तंत्रसुद्धा शिकायला मिळणार आहे. सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------