फिल्मी स्टाईलने दरोडा टाकणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 02:17 AM2018-04-24T02:17:55+5:302018-04-24T02:17:55+5:30
पाच जणांना अटक : २४ लाख हस्तगत; मार्केट यार्ड पेट्रोलपंपाची लूट
पुणे : मार्केट यार्ड येथील पेट्रोलपंपावर जमा झालेली २७ लाख रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी घेऊन जाणाऱ्यांना हत्याराचा धाक दाखवून लुटणाºया ५ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक केली असून, त्यांच्याकडून २४ लाख १२ हजार १५० रुपये हस्त करण्यात आले आहेत़
आहद अन्वर सय्यद (वय २२), साकीब मेहबूब चौधरी ऊर्फ लतील बागवान (वय २०), तौसिफ ऊर्फ मोसीन जमीर सय्यद (वय २३) जमीर अहमद हुसेन सय्यद (वय ५९, चौघेही रा़ संतोषनगर, कात्रज) आणि सूरज ऊर्फ मोटा ऊर्फ दस्तगीर शमशुद्दिन यालगी (वय १९, रा़ टिळेनगर, कोंढवा रोड, कात्रज) अशी त्यांची नावे आहेत़
अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम मोरे यांनी माहिती दिली़ धनकवडी भागातील शंकरमहाराज मठाशेजारी असणाºया पेट्रोलपंपावर काम करणारे बर्नाटदास अँथोनी हे पंपावर जमा झालेली २७ लाख ५९ हजार रुपयांची रोकड घेऊन भवानी पेठेतील बँकेत भरण्यासाठी मोटारीने २६ मार्च २०१८ रोजी निघाले होते़ त्या वेळी दोन तरुणांनी हत्याराचा धाक दाखवून ही रोकड लुबाडून नेली होती़ पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज, माहिती यावरून गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. त्या वेळी गुन्हा केल्यानंतर सर्व जण बंगळुरू, हैदराबाद, हुमणाबाद, गुलबर्गा व इतर शहरांत पळून जाऊन वास्तव्य करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चेन्नई, गुलबर्गा येथे जाऊन अटक केली. या सर्वांना अटक करण्यासाठी पोलिसांनी तब्बल १२ ते १५ हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांच्याकडून गुन्ह्यात लुबाडलेली २४ लाख १२ हजार १५० रुपयांची रोकड जप्त केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम मोरे, शकुर सय्यद, सहायक निरीक्षक रवींद्र बाबर, पोलीस कर्मचारी संदीप राठोड, अतुल साठे, अनिल घाडगे, अशोक भोसले, गुणशिंलन रंगम, रोहिदास लवांडे, राजू रासगे, महेंद्र पवार, गजानन गनबोटे, अनिल भोसले, शिवानंद स्वामी, आजिनाथ काळे, संदीप तळेकर, कल्पेश बनसोडे, सुजित पवार, संदेश निकाळजे, नागेश माळी, नीलेश देसाई यांनी कारवाईत भाग घेतला.
दस्तगीर यालगी हा ४ महिन्यांपूर्वी पेट्रोल भरण्यासाठी या पेट्रोलपंपावर गेला होता़ त्या वेळी सोमवारी तेथे जास्त प्रमाणात कॅश जमा होत असल्याचे त्याने पाहिले होते़ यावरून त्याला ही रक्कम लुटण्याची कल्पना सुचली़ त्यानंतर त्यांनी यासाठी संपूर्ण ड्रेस नव्याने खरेदी केले़ सीम कार्ड, मोबाईल, हँडसेट खरेदी करून मोटारसायकल चोरली होती़ त्यानंतर दोन ते तीन सोमवारी त्यांचा हा प्लॅन फसला होता़ साकीब मेहबूब चौधरी याने २६ मार्च रोजी टेहळणी करून पेट्रोलपंपावरील लोक कधी बाहेर पडतात, याची वाट पाहत थांबला होता़ ते बाहेर पडताच मोटार आडवी घालून त्यांच्या मोटारीला अडवून पुढे नेले होते़ त्यांची मोटार कोंढवा बिबवेवाडी रोडवर आल्यावर दुचाकीवरील दोघांनी हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड घेऊन ते पसार झाले होते़ ते देहूरोडला गेले़
तेथून ते बंगळुरू, हुमणाबाद, गुलबर्गा येथे गेले़ तौसिफ सय्यद याला अटक केल्यावर त्याने यातील रोकड हैदराबाद येथे एअर होस्टेस असलेल्या बहिणीकडे व वडील जमीर हुसेन सय्यद यांच्याकडे दिली असल्याचे सांगितले़ बहिणीने दुसºयाकडे ठेवायला दिलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली़ मुलाला अटक केल्याचे समजताच जमीर सय्यद हे कुटुंबासह कर्नाटकात पळून गेले होते़ त्यांना चेन्नईजवळ असलेल्या नेल्लोर येथून ताब्यात घेतले व देहूरोड येथे ठेवलेली रक्कम जप्त करण्यात आली़