चित्रपट महामंडळ उघडतेय लघुपटांचे नवदालन!
By admin | Published: June 1, 2017 02:44 AM2017-06-01T02:44:46+5:302017-06-01T02:44:46+5:30
सर्जनशील अभिव्यक्ती आणि प्रयोगशीलतेचे प्रभावी माध्यम असलेले लघुपट अद्याप दुर्लक्षित आहेत. लघुपटांना नवे दालन खुले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सर्जनशील अभिव्यक्ती आणि प्रयोगशीलतेचे प्रभावी माध्यम असलेले लघुपट अद्याप दुर्लक्षित आहेत. लघुपटांना नवे दालन खुले करून देण्याच्या दृष्टीने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे. लघुपट निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महामंडळातर्फे स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येत आहे. १२ जून रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.
स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत सर्व विषयांना स्पर्श करण्याची ताकद बाळगणारे लघुपट हे एक प्रभावी माध्यम आहे. एखादा विषय कमीतकमी वेळात प्रेक्षकांसमोर मांडण्याचे कसब लघुपटातून साधता येते. आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमार्फत अनेक भारतीय संकल्पना-विचार जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचू लागल्या आहेत. लघुपटांना नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने महामंडळाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यभरातून लघुपट दिग्दर्शक, निर्मात्यांना नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले आहे. १५ जूनपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.
लघुपटांच्या निर्मितीनंतर त्याचे प्रमोशन, वितरण, प्रदर्र्शन यासाठी महामंडळातर्फे सहकार्य केले जाणार आहे. आजकाल युट्यूबसारख्या माध्यमातून लघुपट कमी वेळेत जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचतात. अनेक वेब चॅनेलनी लघुपटांना आर्थिक साहाय्य देण्याची तयारी दर्शवली आहे. चित्रपट महामंडळ या चॅनेल कंपन्यांशी करार करून लघुपटांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. लघुपट निर्मात्यांना अत्यंत नाममात्र दरात महामंडळाकडे नोंदणी करता येणार आहे.
शासनाकडून ज्याप्रमाणे चित्रपटांना अनुदान मिळते, त्याचप्रमाणे लघुपटांना अनुदान मिळवून देण्यासाठीही चित्रपट महामंडळ प्रयत्नशील आहे. याबाबत राजेभोसले म्हणाले, ‘शासनाकडून लघुपटांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबतचा प्रस्ताव यापूर्वीही शासनाकडे पाठवण्यात आला होता. राज्यातील लघुपट निर्मात्यांची यादी तयार करून ती सुपूर्त करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने स्वतंत्र लघुपट विभाग सुरू करून नोंदणी सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली जाणार आहे. लघुपटांच्या प्रदर्शनासाठी स्पेशल प्रिव्ह्यू थिएटरची योजना आखली जाईल.’
लघुपटांच्या माध्यमातून दैनंदिन जगण्यातील अनेक समस्या अधिक प्रकर्षाने लोकांपुढे आणाव्या आणि प्रेक्षकांचे मनोरंजनातून समाज प्रबोधन घडावे, यासाठी लघुपटांना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याची नितांत गरज आहे. लघुपटांचा स्वतंत्र विभाग सुरू केल्याने ग्रामीण भागातील लघुपट निर्मात्यांनाही चालना मिळणार आहे. त्यासाठी चित्रपट महामंडळाचे २५,००० सदस्य कार्यरत राहणार आहेत.
लघुपट महोत्सवासाठी नोंदणी आवश्यक
राज्यासह देशामध्ये अनेक लघुपट महोत्सव आयोजित केले जातात. बऱ्याच महोत्सवांसाठी अवास्तव शुल्क आकारणी करून भरपूर पैसे कमावले जातात. बोगस लघुपट महोत्सवांना आळा घालण्यासाठी चित्रपट महामंडळातर्फे आचारसंहिता तयार केली जात आहे. लघुपट महोत्सवांसाठी चित्रपट महामंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यामध्ये लघुपटांची संख्या, स्क्रीनिंग, प्रवेश फी याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे.