साहित्यकृतींवर आधारीत चित्रपट निर्मिती व्हावी : लक्ष्मीकांत देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 06:39 PM2018-05-02T18:39:35+5:302018-05-02T18:39:35+5:30
संवाद आणि आशय फिल्मतर्फे ‘संवाद मराठी चित्रपटांचा’ हे मराठी चित्रपट संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
पुणे : चित्रपट ही मानवी मनाचे दर्शन घडवणारी कला आहे. साहित्यकृतीतून शाश्वत मूल्ये जपली जातात. हे मूल्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी साहित्यकृतीवर आधारित मराठी चित्रपटांची निर्मिती होणे आवश्यक आहे. साहित्यावर आधारित चित्रपट निर्मिती झाल्यास या माध्यमातून रसिकांना पुनश्च आनंद घेता येईल. साहित्यावर आधारित चित्रपट निर्मिती ही बाब चित्रपट आणि साहित्यकृती एकमेकांना पूरक अशीच आहे, असे मत संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
संवाद आणि आशय फिल्मतर्फे ‘संवाद मराठी चित्रपटांचा’ हे मराठी चित्रपट संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त भरवण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी संवादचे प्रमुख सुनील महाजन, राजू कावरे, नारायण मोकाशी, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार उपस्थित होते. या प्रदर्शनात सुमारे चाळीसहून अधिक छायाचित्र लावण्यात आली असून राजा हरिश्चंद्र चित्रपटाच्या छायाचित्रापासून आतापर्यंतचा आढावा घेण्यात आला आहे. छायाचित्र प्रदर्शन ४ मेपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे.
छायाचित्र प्रदर्शन उदघाटनानंतर झालेल्या रसास्वाद लघुपट-अनुबोधपटांचा या कार्यशाळेत ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक समर नखाते आणि ज्येष्ठ चित्रपट रसास्वाद अभ्यासक श्यामला वनारसे यांनी मार्गदर्शन केले. या अभिनव कार्यशाळेत पूर्ण लांबीच्या चित्रपटाचा विषच एका छोट्याशा लघूपटातून प्रभावीपणे मांडता येऊ शकत असणाऱ्या माध्यमांचे तंत्र, दिग्दर्शन, लेखन, संगीत, अशा विविध अंगांचा शास्त्रशुद्ध परिचय आणि मूलतत्वांची ओळख करून देण्यात आली.
देशमुख म्हणाले, ‘दिग्दर्शकांनी कथा, पटकथा, संवाद याबाबींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. मराठी चित्रपटांचा हा आलेख अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. ज्या दिग्दर्शकाला साहित्याचे अंग नाही, तो मोठा चित्रपट बनवू शकत नाही. चित्रपट ही कला केवळ मानवनिर्मित नसून ती विज्ञाननिष्ठ देखील कला आहे. चित्रपट माध्यम हे अभिव्यक्तीसाठी अधिक जवळचे वाटते.’