केबल डक्टच्या कामाला अखेर मंजुरी
By admin | Published: July 1, 2017 08:03 AM2017-07-01T08:03:30+5:302017-07-01T08:03:30+5:30
एस्टिमेट कमिटीने दोन वेळा नकार देत फेटाळलेले आॅप्टिकल फायबर केबलसाठीच्या डक्टच्या २२५ कोटी रुपयांच्या कामाला अखेर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एस्टिमेट कमिटीने दोन वेळा नकार देत फेटाळलेले आॅप्टिकल फायबर केबलसाठीच्या डक्टच्या २२५ कोटी रुपयांच्या कामाला अखेर कमिटीची मंजुरी मिळवण्यात आयुक्त कुणाल कुमार यांना यश आले. शुक्रवारी झालेल्या बैठकीत या कामाला मंजुरी देत कमिटीने पूर्वी दिलेल्या नकारावर होकाराचे शिक्कामोर्तब केले. आयुक्तांनी त्यासाठी खास प्रयत्न केले असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
समान पाणीपुरवठा योजनेच्या कामात हे काम आयुक्तांनी टाकले होते. त्यासाठी नियमाप्रमाणे एस्टिमेट कमिटी, स्थायी समिती, सर्वसाधारण समिती यांची संमती घेण्यात आली नाही. त्यावरून बराच ओरडा झाला. या कामाची निविदाही मंजूर झाली असून त्यावरूनही वाद निर्माण झाले आहेत. काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी सांगितले की मुळातच एका कामात दुसरे काम व तेही २२५ कोटी रुपयांचे समाविष्ट करून एकत्रितपणे मंजूर करून घेणे बेकायदेशीर आहे. एस्टिमेट कमिटी ही कामाच्या सोयीसाठी तयार केलेली कमिटी आहे. कोणतेही काम स्थायी समितीत व सर्वसाधारण सभेत मंजूर झाले पाहिजे असे बागुल म्हणाले. या कामाला मंजुरी मिळाली असली तरी पुढे त्यात कायदेशीर अडचणी येणारच आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान या २२५ कोटी रुपयांच्या डक्टच्या कामांच्या निविदा प्रक्रियेलाही काही जणांनी हरकत घेतली आहे. त्यात प्रामुख्याने महापालिकेच्याच विधी विभागाने प्रक्रियेत त्रुटी असल्याचा अभिप्राय दिला आहे. बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी डक्टच्या कामात कमिटीने यापूर्वी ज्या त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या त्याचे निराकरण केले. त्यामुळे प्रस्ताव समाधानकारक आहे असे मत व्यक्त करून या कामाला मंजुरी दिली.