कचरा प्रश्नावर अखेर आराखडा
By admin | Published: May 24, 2017 04:36 AM2017-05-24T04:36:30+5:302017-05-24T04:36:30+5:30
शहरामध्ये जमा होणार कचऱ्याचे जागेवरच शंभर टक्के वर्गीकरण करणे, संकलन करणे आणि प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या विविध भागांत प्रक्रिया प्रकल्प उभे करून शहराचा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरामध्ये जमा होणार कचऱ्याचे जागेवरच शंभर टक्के वर्गीकरण करणे, संकलन करणे आणि प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या विविध भागांत प्रक्रिया प्रकल्प उभे करून शहराचा कचरा शहरामध्येच जिरवण्यावर आराखड्यात प्राधान्य देण्यात आले आहे. शहराचा कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने अल्प व दीर्घकालीन आराखडा तयार केला आहे. महापौर मुक्ता टिळक यांची मंजुरी मिळाल्यानंतर हा आरखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. यामुळे तब्बल २१ दिवस शहरातील कचऱ्याची एकही गाडी उरुळी देवाची येथील कचरा डेपोवर येऊ दिली नाही. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ग्रामस्थांची भेट घेतली, तेव्हा हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासनाने एक महिन्याच्या आत कचरा प्रश्नावर कृती आराखडा तयार करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले होेते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा आराखडा तयार केला आहे. यामध्ये अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात चालू वर्षासह सन २०१९ ते २०१५ पर्यंत विविध उपाययोजना करण्याचे नियोजन आराखड्यात करण्यात आले आहे.
आराखड्यात प्रामुख्याने लोकांचा सहभाग वाढवून विविध उपाययोजना करण्यात येणार असून, त्यात नागरिकांसाठी दहा कलमी कार्यक्रम आखला आहे. तसेच ई-कचरा, राडारोड्याच्या तक्रारींसाठी ‘मोबाईल अॅप’ची निर्मिती करण्यात येणार आहे. भूभरावाच्या जमिनींचे पुनर्जीवन, त्याकरिता दोन हजार क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प नियोजित केला आहे. भूभरावाच्या जमिनींचा पुन्हा वापर करता येईल, असेही आराखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे.