प्रवेशद्वार मोजतंय अखेरच्या घटका
By admin | Published: May 1, 2017 02:00 AM2017-05-01T02:00:14+5:302017-05-01T02:00:14+5:30
हिवरेतर्फे नारायणगावपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पूर्व पश्चिम विस्तारलेला किल्ले नारायणगड इतक्या वर्षांनंतरही
अशोक खरात / खोडद
हिवरेतर्फे नारायणगावपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर पूर्व पश्चिम विस्तारलेला किल्ले नारायणगड इतक्या वर्षांनंतरही आपल्या अंगाखांद्यावर कोसळलेल्या अवस्थेत असलेल्या प्राचीन प्रवेशद्वार व इतर वास्तूंमुळे एक गडकोट किल्ला म्हणून आपली स्वत:ची ओळख देत अखेरचा श्वास घेत उभा आहे.
नारायणगडावरील राजवाड्याजवळील कोसळलेल्या प्रवेशद्वाराची गणेशपट्टी, खांब व शेजारीच असलेले सामर्थ्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे शरभ
शिल्प हे नारायणगडाच्या प्राचीन अस्तित्वाची आजही साक्ष देत आहेत. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे नारायणगडावरील ऐतिहासिक वारसा जपत असलेली एक एक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
नारायणगडावर आढळणारी प्राचीन शिल्प, पाण्याच्या टाक्या व येथील इतर प्राचीन वास्तू शिवकालीन (१६ व्या शतकातील) आहेत. नारायणगड हा शिवकालीन असावा असा तर्क दुर्गअभ्यासकांकडून लावला जात आहे.
नारायणगडावर एका झाडाचा आधार घेत उभा असलेला काही भाग आणि कोसळलेला काही भाग अशा अवस्थेतील हे दगडी प्रवेशद्वार निश्चित पर्यटकांना व अभ्यासकांना प्राचीन काळात घेऊन जात आहेत.
हिवरे, खोडद, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर, मंचर येथील तरुणांनी एकत्र येऊन व्हॉट्सअॅपवर ‘दुर्गप्रेमी-निसर्गमित्र’ नावाचा ग्रुप तयार केला असून, हा ग्रुप व शिवाजी ट्रेल या संस्थेच्या वतीने नारायणगड संवर्धनाचे कार्य दोन वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे.
शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडून नारायणगडाची कोणतीच दखल न घेतल्याने गडावरील या प्राचीन वास्तू शेवटच्या घटका मोजताना पाहावयास मिळत आहेत. जुन्नर तालुक्यात शिवनेरी, चावंड, हडसर, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, नारायणगड असे सात किल्ले आहेत.
या सर्व किल्ल्यांपैकी एकमेव नारायणगड असा किल्ला आहे की ज्याचे बुरुज व चोरदिंडी दरवाजा आजही शाबूत आहेत. चोरदिंडी दरवाजा म्हणजे साधारणपणे चार फूट बाय चार फूट रुंदीचे चौकोनी भुयार होय. या भुयारावर वरच्या बाजूने मोठमोठे दगड लावून या दगडांवर माती टाकून हा दरवाजा पूर्णपणे झाकून ठेवला जात असे.
विशेष म्हणजे हा चोरदिंडी दरवाजा झाडाझुडपांनी पूर्णपणे वेढलेला असल्याने तो शत्रुसैन्याच्या लक्षात येत नसायचा. शत्रूच्या सैन्याने किल्ल्याला वेढा दिल्यानंतर किंवा किल्ल्यावर आक्रमण केल्यानंतर किल्ल्यावरील सैनिक या चोरदिंडी दरवाजावरील माती व दगड बाजूला करून दोराच्या सहायाने खोल दऱ्यांच्या मार्गे सुखरुप निघून जात असत.
वेळप्रसंगी पुन्हा त्याच मार्गाने किल्ल्यावर येऊन शत्रूसैन्यावर पुन्हा नव्या जोमाने हल्ला चढवायचा आणि त्यांना नेस्तनाबूत करायचे. केवळ याच दोन मुख्य कारणांसाठी या चोरदिंडी दरवाजाचा वापर केला जायचा.