लॉरा व मारियाना यांच्यात अंतिम लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:10 AM2021-03-14T04:10:22+5:302021-03-14T04:10:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखान्यातर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित पंचवीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखान्यातर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित पंचवीस हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत ब्राझीलच्या लॉरा पिगोस्सी आणि युक्रेनच्या मारियाना झकारल्यूक यांनी अनुक्रमे ग्रेट ब्रिटनच्या इमेली वेबली-स्मिथ व रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारु यांचा पराभव केला. या दोघींमध्ये आता एकेरीची अंतिम लढत रविवारी (दि. १४) सकाळी दहा वाजता होणार आहे.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर खेळल्या जाणााऱ्या या स्पर्धेत एकेरीच्या मुख्य ड्रॉच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ब्राझीलच्या तिसऱ्या मानांकित लॉरा पिगोस्सीने सहाव्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या इमेली वेबली-स्मिथचा एकतर्फी पराभव केला. लॉराने इमेलीचे आव्हान एक तास नऊ मिनिटांत सहज परतावून लावले. पहिल्या सेटमध्ये लॉराने सुरुवातीपासूनच इमेलीवर वर्चस्व राखले. पिछाडीवर असलेल्या इमेलीला लॉराने कमबॅकची संधी दिली नाही. लॉराने आपला रंगतदार खेळ सुरू ठेवत सातव्या गेमला इमेलीची सर्व्हिस भेदली व सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्येदेखील लॉराने दबदबा कायम राखला. या सेटमध्ये लॉराने इमेलीची दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट जिंकून विजय मिळवला.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या लढतीत पाचव्या मानांकित युक्रेनच्या मारियाना झकारल्युक हिने दुसऱ्या मानांकित रोमानियाच्या मिरीयम बियांका बुलगारुचा टायब्रेकमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना तीन तास तेरा मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. सामन्यात ५-५ अशी बरोबरी असताना दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. दुसऱ्या सेटमध्ये बुलगारुने आक्रमक खेळ करत दुसऱ्या गेममध्ये मारियानाची सर्व्हिस ब्रेक केली व आघाडी घेतली. पिछाडीवरील मारियानाने जोरदार कमबॅक करत पाचव्या, सातव्या गेममध्ये बुलगारुची सर्व्हिस रोखली व सेट जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये मारियानाने बुलगारूची पहिल्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट जिंकून विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: उपांत्य(मुख्य ड्रॉ)फेरी: महिला:
लौरा पिगोस्सी, ब्राझील (३) वि.वि. इमेली वेबली-स्मिथ, ग्रेट ब्रिटन (६) ६-१, ६-१,
मारियाना झकारल्युक, युक्रेन (५) वि.वि. मिरीयम बियांका बुलगारु, रोमानिया (२) (५) ६-७, ६-४, ६-४