दहावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:02+5:302021-07-07T04:13:02+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर करण्याबाबतचे सूत्र प्रसिद्ध करण्यात ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दहावीचा निकाल जाहीर करण्याबाबतचे सूत्र प्रसिद्ध करण्यात आले. राज्य मंडळाने सर्व शाळांना त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर राज्य मंडळाने दिलेल्या संगणकीय प्रणालीत ऑनलाइन गुण भरण्याचे काम शाळांकडून सुरू आहे.
राज्य मंडळ, मुख्याध्यापक संघ, शिक्षक संघटना यांनी इयत्ता दहावीचा लवकर तयार व्हावा, यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत. शाळांना विद्यार्थ्यांचे गुण भरण्यास येत्या ९ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या १५ जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कारण काही विद्यार्थ्यांच्या निकालाला अद्याप शाळांनी हातच लावला नाही.
राज्यातील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रक्रिया अद्याप सुरूच झालेले नाही. त्यात सर्वाधिक १ हजार ३६८ विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत. काही विद्यार्थ्यांच्या गुणांबाबत निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. मात्र, राज्य मंडळाकडून या अडचणी सोडवल्या जात आहेत. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांचा निकालसुद्धा लवकर तयार होईल, अशी आशा व्यक्त केले जात आहे.
--------
कोल्हापूर व कोकण विभागातील शाळांनी इयत्ता दहावीच्या निकालासाठी राज्य मंडळाच्या संगणक प्रणालीत गुण भरण्यामध्ये आघाडी घेतली असून लातूर, नागपूर, अमरावती विभागातील शाळांचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे विभागातील शाळा येत्या नऊ जुलैपर्यंत गुण भरण्याचे काम पूर्ण करतील, अशी अपेक्षा निकाल तयार करणा-या समन्वय समितीतील अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
-----
* राज्यातील इयत्ता दहावीची परीक्षा देणारे एकूण विद्यार्थी : १६,४,४४१
* किती विद्यार्थ्यांचे गुण संगणक प्रणालीत भरून कन्फर्म केले : १५,९२,४१८
* किती विद्यार्थ्यांचे गुण अद्याप कन्फर्म केले नाही: ८,९७१
* किती विद्यार्थ्यांच्या निकालाला अद्याप हातही लावला नाही : ३,०५२
-------