अंतिम फेरी दोन नाट्यगृहांत
By admin | Published: February 21, 2017 03:07 AM2017-02-21T03:07:25+5:302017-02-21T03:07:25+5:30
राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात रंगणार असली तरी ती होत आहे दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये. राज्य सांस्कृतिक
पुणे : राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पुण्यात रंगणार असली तरी ती होत आहे दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांमध्ये. राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पर्धेचा कालावधी कमी करण्यासाठी ही क्लृप्ती शोधून काढली आहे. त्यावर ज्येष्ठ नाट्य समीक्षक माधव वझे यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र स्पर्धा अशा पद्धतीने घेण्यावर सांस्कृतिक संचालनालय ठाम आहे.
स्पर्धकांना एकाच पातळीवर ठेवायचे असेल तर एकच नाट्यगृह मिळायला हवे आणि एकाच वेळी ते सादर करण्याची संधी दिली पाहिजे असे वझे यांचे म्हणणे आहे. मात्र, व्यावसायिक नाटकेदेखील दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांत होतातच ना, मग स्पर्धा का घेतल्या जाऊ शकत नाही, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांनी वझे यांचा आक्षेप झटकला आहे. स्पर्धेविषयीच्या या निर्णयाबद्दल कुणाचा विरोध असेल तर तो मला सांगावा, मी बघेन काय करायचे ते? असा एकाधिकारशाहीचा सूर संचालकांनी आळविला आहे.
यासंदर्भात राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘व्यावसायिक नाटके ही दोन वेगळ्या नाट्यगृहांत होतात. मग स्पर्धा का नाही? २० नाटकांना वीस दिवस लावण्यापेक्षा दोन वेगवेगळ्या नाट्यगृहांत त्या आयोजित केल्याने परीक्षकांचा वेळही वाचणार आहे. आत्तापर्यंत एकही स्पर्धक किंवा परीक्षकाने यावर आक्षेप नोंदविलेला नाही. कुणाला काही सांगायचे असेल तर त्यांनी मला थेट सांगावे.’’
(प्रतिनिधी)
भरत नाट्य मंदिर व टिळक स्मारकात अंतिम फेरीचे उद्यापासून आयोजन
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने यावर्षीच्या ५६व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान टिळक स्मारक मंदिर आणि भरत नाट्य मंदिरात ही स्पर्धा रंगणार आहे. पहिल्यांदाच होणाऱ्या या प्रयोगावर माधव वझे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दोन्ही नाट्यगृहांमध्ये मिळणाऱ्या सुविधा या वेगळ्या आहेत. भरत नाट्यमध्ये कलाकार व प्रेक्षक यांच्यात एक नाते तयार होत असल्यामुळे तिथे जेवढे नाटक रंगते तितकेच टिळक स्मारक काय कुठल्याच नाट्यगृहात रंगत नाही. टिळक स्मारकची पहिली रांग दूर असणे, रंगमंचाची खोली, प्रकाशव्यवस्था, पडदा पडण्याची प्रक्रिया अशा खूप गोष्टी आहेत ज्या स्पर्धकांवरअन्याय करणाऱ्या ठरू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
व्यावसायिक नाटकांमधल्या कलाकारांना तडजोडी कराव्या लागतात, त्या करण्यात नवल नाही, पण स्पर्धा ही समान पातळीवर असायला हवी आणि नाटकांची बक्षिसे वाढविण्यापेक्षा परीक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.