‘स्मार्ट सिटी’ आराखडा अंतिम टप्प्यात
By Admin | Published: November 22, 2015 03:40 AM2015-11-22T03:40:08+5:302015-11-22T03:40:08+5:30
केंद्र शासनाकडे पाठवायच्या ‘स्मार्ट सिटी’ आराखड्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच तो पूर्णत्वास जाईल. पुणेकर नागरिकांकडून तीन टप्प्यांमध्ये त्यांची मते, सूचना
पुणे : केंद्र शासनाकडे पाठवायच्या ‘स्मार्ट सिटी’ आराखड्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच तो पूर्णत्वास जाईल. पुणेकर नागरिकांकडून तीन टप्प्यांमध्ये त्यांची मते, सूचना, शिफारशी जाणून घेऊन त्यांचा या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा केंद्र शासनाकडे १५ डिसेंबरपर्यंत पाठविला जाणार आहे.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी योजने’तील १०० शहरांमध्ये पुणे शहराची निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्यातून २० शहरांची निवड होणार आहे. त्याकरिता या १०० महापालिकांना आराखडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यातून स्पर्धा होऊन, २० शहरांची निवड होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये समावेशासाठी राज्यातून पुणे शहराची दावेदारी भक्कम मानली जात आहे.
‘स्मार्ट सिटी’चा आराखडा बनविताना पुणे महापालिकेने सुरुवातीपासून नागरिकांच्या सहभागावर भर दिला आहे.
‘स्मार्ट सिटी’अंतर्गत विकसित करण्यासाठी ‘मॉडेल एरिया’ म्हणून औंध-बाणेर भागाची निवड केली आहे. ‘स्मार्ट सिटी प्रदर्शना’मध्ये सहभागी होण्यासाठी आयुक्त कुणाल कुमार परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी तिथे पाहिलेल्या काही निवडक प्रकल्पांचाही समावेश ‘स्मार्ट सिटी’ आराखड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. ‘स्मार्ट सिटी योजने’मध्ये शहरांची निवड करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षकांना निमंत्रित केले जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल, असाच आराखडा तयार करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
आता पुणेकरांचा ‘स्मार्ट सिटी योजने’साठी पाठिंबा दर्शविणारी प्रतिज्ञापत्रे भरून घेतली जाणार आहेत. येत्या २५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. शहराच्या समस्या सोडविण्यासाठी संपूर्ण देशासमोर आदर्श उदाहरण घालून देऊ, अशी प्रतिज्ञेचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.