पीएमआरडीए मेट्रोची अंतिम निविदा प्रसिद्ध, हिंजवडी-शिवाजीनगर मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:24 AM2018-03-17T00:24:58+5:302018-03-17T00:24:58+5:30
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी पात्र ठरलेल्या तीन निविदाधारकांना २७ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी पात्र ठरलेल्या तीन निविदाधारकांना २७ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या कामाची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल, अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
राज्य शासनाने दि. २ जानेवारी २०१८ रोजी हा प्रकल्प राबविण्यास मंजुरी दिली आहे. मेट्रोच्या निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. या कामासाठी टाटा रिअॅलिटी, सिमेन्स, आयएल, एफएस आणि आयआरबी या खासगी कंपन्या आर्थिक मदतीसाठी सहभागी झाल्या आहेत. यातून पात्र कंपनीची निवड केली जाणार आहे. देखभाल-दुरुस्तीची जबाबदारीदेखील या कंपनीचीच असेल.
खासगी कंपन्यांनी सादर केलेल्या आर्थिक आराखड्याची तपासणी करूनच अंतिम एका कंपनीसोबत करार केला जाईल.
>मेट्रो प्रकल्प हा सार्वजनिक वाहतुकीचा व हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देणारा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणारा प्रकल्प आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या विकासाकरिता खासगी कंपनीची निवड करण्यासाठी आर्थिक निविदा मागविण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या खासगी कंपनीशी करार करून मेट्रोच्या कामाला सुरुवात होईल, असे गित्ते यांनी सांगितले.