Pune City: अखेर शनिवार - रविवारच्या सुटटयांना ब्रेक! पुणे शहर दररोज स्वच्छ दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 05:28 PM2022-12-25T17:28:38+5:302022-12-25T17:31:29+5:30
स्वच्छता कर्मचाऱ्यांना एका दिवसा ऐवजी आठवडयातील प्रत्येक दिवशी समप्रमाणात सुटटया दिल्या जाणार
पुणे : पुणे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना शनिवारी आणि रविवारी एकाच दिवशी सुटटी दिली जाते. त्यामुळे या दिवशी अवघे २० टक्के कर्मचारी कामावर असतात. त्याने शहरातील अनेक भागात कचर्याचे ढिग साचले जातात. त्यातच आठवड्यात एखादी शासकीय सुट्टी असल्यास आणखी स्थिती वाईट होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला उशिरा जाग आली असुन आता स्वच्छता कर्मचाऱ्यांना एका दिवसा ऐवजी आठवडयातील प्रत्येक दिवशी समप्रमाणात सुटटया दिल्या जाणार आहेत. त्यांची अमंलबजावणी टप्पाटप्पाने सुरू केली आहे.
शहरात निर्माण होणारा दैनंदिन कचरा संकलन तसेच वाहतुकीसाठी तब्बल १२ ते १२ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांची फौज आहे. शहरातील स्वच्छत कर्मचाऱ्यांना शनिवारी आणि रविवारी एकाच वेळी सुट्टी दिली जाते. तातडीची बाब उद्भवल्यास कर्मचारी असावेत, म्हणून केवळ १० ते १५ टक्के कर्मचारी प्रत्यक्ष कामावर असतात. मात्र, या दिवशी कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या चालकांनाही सुट्टी दिली जाते. परिणामी, ही वाहने नसल्याने हे कामावर असलेले कर्मचारीही काम करत नाहीत. तर शनिवार, रविवार अनेकदा नागरिक घर स्वच्छता करतात. खरेदीसाठीही बाहेर पडतात. त्यामुळे या दोन दिवसांत व्यवसायांचा कचरा, हॉटेलचा कचरा, तसेच घरातील स्वच्छतेचा कचरा शहरात वेगवेगळ्या भागांत साचतो.
हा कचरा त्याच दिवशी उचलला न गेल्याने सोमवारी त्यात भर पडते. हा कचरा उचलण्यास पुढे महापालिकेस दोन ते तीन दिवस जातात. तोपर्यंत शुक्रवार उजाडलेला असतो. परिणामी, शहराच्या अनेक भागात आठवडाभर कचरा पडून राहत आहे. सध्या शनिवार-रविवार स्वच्छता सेवकांना सुट्टी असते. त्यामुळे या दोन्ही दिवशी संकलनाचे काम कमी होते. ही बाब लक्षात घेऊन दररोज ७० टक्के कर्मचारी स्वच्छतेसाठी कसे राहतील, याचे नियोजन सुरू आहे. त्यासोबतच कचरा उचलण्यासाठी वाहनेही आवश्यक असून या दोन्ही घटकांचा एकत्रित समावेश करून नियोजन केले जात आहे.त्यामुळे शासकीय सुट्टीच्या दिवशीही शहर स्वच्छ ठेवले जाणार आहे.
''महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना रविवारी सुटटी दिली जाते. त्या दिवशी २० टक्के कर्मचारी कामावर असतात. त्यामुळे आता सर्व दिवशी समप्रमाणात सुटटी देण्याचे नियोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयात करण्यात आले आहे. कसबा क्षेत्रिय कार्यालय येथे यांची अमंलबजावणी सुरू केली आहे - आशा राउत प्रमुख, घनकचरा विभाग, पुणे महापालिका''