अखेर नवले हॉस्पिटलवर कारवाई; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून हॉस्पिटलला वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 10:08 AM2022-06-15T10:08:39+5:302022-06-15T10:13:54+5:30
पॅकेज परवडत नसल्याने रुग्णांकडून घेतले जात होते पैसे...
कल्याणराव आवताडे
धायरी : महात्मा जोतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेअंतर्गत रुग्णांवर उपचार करणे परवडत नसल्याचे कारण सांगून रुग्णांकडून अधिकचे पैसे घेत असल्याचा प्रकार नऱ्हे येथील श्रीमती काशिबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमध्ये घडत होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून योजनेतून हॉस्पिटलचा परवाना निलंबित केला आहे. हॉस्पिटल प्रशासनाला त्याबाबत तसा संदेशदेखील पाठविण्यात आला आहे.
महात्मा जोतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजना गोरगरिबांसाठी संजीवनी ठरत आहे. योजनेंतर्गत अनेकांना खासगी रुग्णालयात उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळत आहेत; परंतु योजना राबविताना नोंदणीकृत रुग्णालये मात्र रुग्णांच्या इतर चाचण्या करण्याच्या नावाखाली पैसे घेऊन रुग्णांची लूट करीत असल्याचा प्रकार समोर येत आहे. परिणामी, गरीब रुग्णांसाठी मोफत ठरणारा उपचार प्रत्यक्षात मात्र महागडा ठरत आहेत.
वास्तविक पाहता, आरोग्य योजनेअंतर्गत असणाऱ्या रुग्णांकडून एक रुपयाही घेता कामा नये. मात्र संबंधित हॉस्पिटलकडून इतर चाचण्या करायच्या नावाखाली आम्हा रुग्णांकडून पैसे घेत. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना मेडिकलमधून रोज औषधे आणावयास सांगत. याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून योजनेतून हॉस्पिटल निलंबित केले आहे.
काय आहे जन आरोग्य योजना....
१.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारकांना यादीकृत व्याधी आणि शस्त्रक्रियेसाठी दीड लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. काही उपचारांसाठी ही मर्यादा वाढवून दोन लाखांपर्यंत करण्यात आली आहे.
२. रुग्णालयामध्ये या योजनेअंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांना प्रारंभिक चाचण्या, उपचारादरम्यान केल्या जाणाऱ्या चाचण्या तसेच उपचाराअंती केल्या जाणाऱ्या चाचण्या योजनेअंतर्गतच समायोजित केल्या जातात.
३. या योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयाचा उपचार, निदान, आवश्यक औषधोपचार व भोजन तसेच एकवेळचा परतीचा प्रवास खर्च यामध्ये सामावेश दिला जातो. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर दहा दिवसांपर्यंतची सेवा पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.
४. या सर्व चाचण्यांचे पैसे रुग्णालयाला मिळतात, असे असतानादेखील काही रुग्णालये इतर चाचण्यांच्या, औषधांच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे उकळत आहेत. मुळात या सर्व चाचण्यांचा खर्च हा योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयामार्फत होणे गरजेचे आहे. ५. प्रत्यक्षात मात्र रुग्णाच्या योजनेसंबंधित अज्ञानाचा फायदा घेत, बहुतांश रुग्णालये रुग्णालाच या सर्व चाचण्यांचा खर्च करण्यास भाग पाडतात. अशा पद्धतीने काळाबाजार करणाऱ्या इतर रुग्णालयांवरही कारवाई होणे गरजेचे आहे.
नवले हॉस्पिटलवर एफडीएकडून होणार कारवाई?
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दिलेली औषधे रुग्णालयात घेण्याची सक्ती करू नये, असा नियम असला तरी, हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या मेडिकलमधूनच औषध खरेदीसाठी रुग्णांवर सक्ती केली जात असल्याचा प्रकार नऱ्हे येथील श्रीमती काशिबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमध्ये घडत असल्याचे समोर आले होते.
उपचार करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रिस्क्रिपशन न देता फक्त रजिस्ट्रेशन नंबर देऊन त्यांच्याच असणाऱ्या मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर एफडीएने चौकशी केली असून, याबाबत अहवाल तयार करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत यावर निर्णय घेऊन कारवाई करणार असल्याचे अन्न व औषधे प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश पाटील यांनी बोलताना सांगितले.