अखेर ३० टँकरला मंजुरी; पण अद्याप सुरू नाहीत!
By admin | Published: May 3, 2017 02:04 AM2017-05-03T02:04:33+5:302017-05-03T02:04:33+5:30
गेला महिनाभर बारामती, आंबेगाव, भोर व जुन्नर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असताना फक्त पुरंदर तालुक्यात ९ टँकर सुरू करण्यात
पुणे : गेला महिनाभर बारामती, आंबेगाव, भोर व जुन्नर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असताना फक्त पुरंदर तालुक्यात ९ टँकर सुरू करण्यात आले होते. टंचाईच्या बैठकांमध्ये टँकरची मागणी झाल्यानंतर आता ३० टँकरला मंजुरी मिळाली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी प्रत्यक्षात गावात अद्याप टँकर गेलाच नसल्याची वास्तव स्थिती आहे.
२३ गावे व २४५ वाड्या-वस्त्यांसाठी ६८ हजार ३६५ लोकसंंख्येला या ३० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यात पुरंदरमध्ये सुरुवातीला ९ टँकर होते, त्यांची संख्या आता १२ झाली असून बारामतीत ८, आंबेगावमध्ये ५, भोरमध्ये २ व जुन्नर तालुक्यात एका टँकरला मंजुरी मिळाली आहे.
गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही व जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात झाल्यानंतरही मार्चअखेरपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसू लागली होती. जानेवारी महिन्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ३७५ गावे व १५५८ वाड्यांवर टंचाई जाहीर करीत २१ कोटी २० लाखांच्या टंचाई आराखड्याला मंजुरी देत त्यातून १०९५ कामे प्रस्तावित केली होती. यात टँकरने व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यासाठी ९ कोटींची रक्कम ठेवली आहे. त्यानंतर मार्च महिन्यात टँकरची मागणी झाल्यानंतर फक्त पुरंदर तालुक्यात ९ टँकर सुरू करण्यात आले होते. बारामती, भोर, आंबेगावमधूनही टँकरची मागणी होती. एप्रिलच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात जिल्हा परिषदेने घेतलेल्या टंचाई आढावा बैैठकीत येथून टँकर सुरू होत नसल्याने ग्रामस्थांनी मोठा संताप व्यक्त केला होता. टंचाई संपल्यानंतर टँकर मिळणार का? असे सुनावले होते. तसेच टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना देण्याची मागणी केली होती. (प्रतिनिधी)