अखेर पुणे शहराला मिळाले आरोग्यप्रमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:04 AM2018-09-21T01:04:01+5:302018-09-21T01:04:05+5:30
शहराला तब्बल पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने पूर्णवेळ आरोग्यप्रमुखांची नियुक्ती केली आहे.
पुणे : शहराला तब्बल पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने पूर्णवेळ आरोग्यप्रमुखांची नियुक्ती केली आहे. शासनाच्या आरोग्य विभागातील मलेरियाचे सहायक संचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांची पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी १० दिवसांत शहराला आरोग्य प्रमुख देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार अखेर शासनाने महापालिकेची ही मागणी पूर्ण केली आहे.
शहरात सध्या डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिय या साथीच्या आजारांच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे पुणेकर नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना आरोग्य सेवा देण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या महापालिकेकडे शहरासाठी आरोग्यप्रमुख नसल्याने हेळसांड होत आहे. यामुळे शहराला पूर्णवेळ आरोग्यप्रमुख द्यावा, यासाठी विविध संस्थांच्या वतीने, विरोधी पक्षांनी अनेक वेळा महापालिकेत आंदोलन केले. महापालिकेच्या मुख्य सभेमध्येदेखील सदस्यांनी आरोग्यप्रमुख मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्र्यांकडे अनेक वेळा लेखी निवेदन देऊन आरोग्यप्रमुख देण्याची मागणी केली होती. यासाठी महापालिका प्रशासनाने तीन वेळा विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन प्रस्ताव मागविले होते; परंतु पुणे शहराच्या आरोग्यप्रमुखासाठी आवश्यक असलेली पात्रता असलेला एकही अर्ज आला नव्हता. त्यामुळे महापालिका प्रशासनदेखील हतबल झाले होते. अखेर शासनाने महापालिकेची मागणी मान्य केली असून, शासनाने संचालक डॉ. रामचंद्र हंकारे यांची आरोग्यप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. हंकारे यांनी आतापर्यंत शासनाच्या आरोग्य विभागात विविध पदांवर काम केले आहे. यामध्ये सातारा, सांगली जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली महापालिकेचे आरोग्यप्रमुख म्हणूनदेखील काम केले आहे. सध्या कोल्हापूर परिमंडळाचे सहायक संचालक, मलेरिया म्हणून ते कार्यरत आहेत.