अखेर चिमकुलीची मृत्यूशी झुंज ८ दिवसांनी संपली; विजेच्या तारेला चिकटून झाली होती गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 04:52 PM2022-12-05T16:52:59+5:302022-12-05T16:53:10+5:30
मुलीवर पिंपरी येथील रुग्णालयात उपचार सुरु होते
लोणी काळभोर : लोणी स्टेशन परिसरातील घोरपडे वस्ती येथे घराच्या छतावरून गेलेल्या विजेच्या तारेला चिकटून गंभीररित्या भाजलेल्या मुलीची मृत्युंशी झुंज अखेर रविवारी(दि.४)संपली. तिच्यावर पिंपरी येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. ही घटना रविवारी (दि.२७)घडली होती.
घराजवळ काही मुले बॅडमिंटन खेळत असतांना, बॅडमिंटनचे छतावर गेलेले फुल काढण्यासाठी भाग्यश्री इमारतीवर गेली होती. छतावर तारांच्या खाली चार फुट उंचीची भित उभारली असल्याने, भाग्यश्री शीडीच्या साह्याने बॅडमिंटनचे फुल काढत असताना विज वाहक तारांच्या संपर्कात आली होती. घटना घडल्यानंतर स्थानिक पत्रकार दिगंबर जोगदंड व राम भंडारी यांनी त्वरित सूत्र हलवून जखमी मुलीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. याकामी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी वैयक्तिक लक्ष घालून मदत केली होती. भाग्यश्री धनंजय बनसोडे असे मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत.
भाग्यश्री बनसोडेचे वडील धनाजी बनसोडे लोणी स्टेशन येथील मालधक्क्यात हमाल असुन ते घोरपडे वस्ती परीसरात महादेव खंदारे यांच्या बिल्डींगमध्ये भाड्याने राहतात. महादेव खंदारे यांच्या बिल्डींगवरुन विजेच्या तारा गेलेल्या आहेत. बिल्डींग उभी असलेल्या जागेतुन विजेच्या तारा गेलेल्या असल्याने, विज वितरण कंपणीने खंदारे यांनी तारांच्या खाली इमारत बांधु नये याबाबत लेखी कळवले होते.