अखेर पात्र लाभार्थ्यांवर शासनाची अनुकंपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:45+5:302021-01-10T04:08:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अनुकंपा यादीतील ज्येष्ठतेनुसार प्रतीक्षायादीत दोन किंवा चार क्रमांक मागे असलेल्या पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती देण्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनुकंपा यादीतील ज्येष्ठतेनुसार प्रतीक्षायादीत दोन किंवा चार क्रमांक मागे असलेल्या पात्र लाभार्थ्यांना नियुक्ती देण्याच्या जिल्हा परिषदेच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या अशा रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबत हा निर्णय सर्व राज्यालाही लागू होणार आहे.
जिल्हा परिषदेतील २० टक्के रिक्त जागा या अनुकंपातत्वावर भरण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या होत्या. त्या नुसार जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ दरम्यान रिक्त होणाऱ्या पदाच्या संवर्गनिहाय २० टक्के रिक्त जागा या अनुकंपा पदभरतीनुसार भरल्या जाणार होत्या. त्यासाठी ज्येष्ठतेनुसार पात्र लाभार्थ्यांची याची तयार करण्यात आली होती. त्यानुसार पदभरती करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत ज्येष्ठता क्रमानुसार ३१ पर्यंतच्या नियुक्त्या झाल्या. मात्र, पुढील ज्येष्ठताक्रमावर असलेल्या उमेदवाराला त्याच्या शैक्षणिक अहर्तनुसार कनिष्ठ सहायक लिपिक व कनिष्ठ सहायक लेखा पदासाठी तो पात्र होता. मात्र, ही सर्व रिक्त पदे आधीच भरली होती. यामुळे ३२ क्रमांकाच्या उमेदवाराला सर्व पदे भरल्याने नियुक्ती देता आली नाही. मात्र, त्याच्या मागील ३३ क्रमांकाचा उमेदवार हा स्थापत्य अभियांत्रीकी सहायक, कंत्राटी ग्रामसेवक, ोषध निर्माता तसेच शिक्षण सेवक पदासाठी पात्र होता. मात्र, ज्येष्ठता नियमानुसार त्याला या पदावर नियुक्ती देता येत नव्हती. यामुळे प्रतीक्षा यादीतील अशा पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होत होता.
यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात अशा पात्र उमेदवारांना नियुक्ती देता यावी यासाठी राज्यशासनाकडे तसा प्रस्ताव पाठवला होता. मंत्रालयाच्या सामान्य प्रशासनाला त्यांनी याबाबत पत्र दिले होते. राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने अनुकंपा यादीत ज्येष्ठता यादीनुसार प्रतीक्षायादीत काही क्रमांक मागे असलेल्या पात्र उमेेदवारांना नियुक्त करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे अशा उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
चौकट
असे आहेत आदेश
शासन धोरणानुसार अनुकंपा नियुक्ती देताना शासनाच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. प्रतीक्षासूचीतील ज्येष्ठतेनुसार अनुकंपा नियुक्ती दिली जावी. तसेच प्रतीक्षासूचीतील ज्येष्ठ उमेदवार हा अनुकंपा नियुक्तीच्या पदासाठीची अर्हता धारण करत नसेल तर यादीतील त्या खालील नजीकचा कनिष्ठ उमेदवार पदासाठी पात्र असल्यास ज्येष्ठ उमेदवाराची ज्येष्ठता डावलून नियुक्ती दिली जाणार आहे. यासंबंधी सर्व खात्री ही संबंधित अधिकाऱ्याला करावी लागणार आहे.
कोट
शासनाच्या या निर्णयामुळे अनुकंपा पदभरतीत महत्वाचा बदल होणार आहे. ज्येष्ठता यादीतील पात्र उमेदवाराला संधी मिळणार आहे. यामुळे अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रियेलाही वेग मिळेल.
- आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी