...अखेर गुंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:57+5:302021-04-02T04:09:57+5:30
बारामती पोलिसांनी नाशिकमधून घेतले ताब्यात बारामती : गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला व पन्नास हजार ...
बारामती पोलिसांनी नाशिकमधून घेतले ताब्यात
बारामती : गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला व पन्नास हजार रुपयांचे बक्षीस असलेला गुंड बाळा दराडे व त्याचा साथीदार विजय गोफणे यांना बारामती तालुका पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. नाशिक मध्ये बारामती तालुका पोलिसांच्या विशेष गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
दराडे याने पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात दहशत माजवली होती. पिस्तुलांची तस्करी करून युवकांना गुन्हेगारी क्षेत्रात आणण्याचा उद्योग तो गेल्या काही वर्षांपासून करत होता. त्यामुळे दराडे टोळीची या भागात दहशत निर्माण झाली होती. एमआयडीसीतल्या व्यापाऱ्यांना, उद्योजकांना धमकावून खंडणी वसूल करणे याशिवाय चोरी, दरोडा, मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर आणि भिगवण परिसरात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. मात्र, कोणत्याही गुन्ह्यात तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गव्हाण यांना गुंड बाळा दराडे नाशिक मध्ये एका आश्रिताच्या मदतीने राहत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार ढवाण यांच्यासह विशेष गुन्हे शोध पथकाचे प्रमुख योगेश लंगोटे आणि त्यांच्या साथीदारांना नाशिकला रवाना करत दराडे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. कुविख्यात गुंड बाळ्या दराडे याच्यावर बारामती तालुका, बारामती शहर, भिगवन, वालचंदनगर, सातारा, शिरवळ, फलटण,कराड पोलीस ठाण्यात तसेच गुजरात राज्यामध्ये मोक्का, खुनाचा प्रयत्न, पोलीसांवर पिस्तुल रोखणे, दरोडा, घरफोडी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
त्यांच्या मागावर संपूर्ण पुणे ग्रामीण पोलीस तसेच सातारा पोलीस होते. परंतु तो राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यात लपून मागील २ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याची माहिती देणाऱ्यास रोख ५० हजार रूपयाचे बक्षीस पोलिसांच्या वतीने जाहीर केले होते. बुधवारी (दि. ३१) तो पंचवटी,नाशिक या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती बारामती तालुका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकास मिळाली होती. ही माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसाच्या गुन्हे शोध पथकाने पंचवटी नाशिक येथे जावून बाळा दराडे व त्याचा साथीदार विजय गोफणे यांना ताब्यात घेऊन अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलीस हवालदार दादा ठोंबरे कॉन्टेबल विनोद लोखंडे, नंदू जाधव, राहूल पांढरे, विजय वाघमोडे, रणजीत मुळीक, अमोल नरूटे यांनी केली.
------------------------
फोटो ओळी : बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने कुख्यात गुंड बाळा दराडे व त्याचा साथीदार विजय गोफणे यांना अटक केली.
०१०४२०२१-बारामती-०२
----------------------