पुण्याची शान असलेल्या जंगली महाराज रोडवर अखेर जेसीबी; ४७ वर्षांपासून नाही एकही खड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 01:02 PM2023-05-28T13:02:54+5:302023-05-28T13:03:07+5:30
आपटे रोडवर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी या रस्त्यावर खोदकाम करण्याची नामुष्की
पुणे : शहराची शान असलेल्या आणि गेली ४ दशके एकही खड्डा न पडलेल्या जंगली महाराज रोडवर अखेर जेसीबी चालविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत २५ कोटी रुपये खर्चून पादचारी मार्ग करताना कमी क्षमतेचे पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी पाइप टाकले गेले. त्यामुळे १४ ऑक्टोबर २०२२ रोजी हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, म्हणून हाँगकाँग लेन ते नदीपात्र अशी भूमिगत पाइपलाइन टाकली जाणार आहे. त्यासाठी जंगली महाराज रोडवर जेसीबी चालवावा लागणार आहे.
महापालिकेने मुंबईतील रेकॉन्डो कंपनीने जंगली महाराज रस्ता तयार केला. आजवर छोटे-मोठे काम सोडले तर हा रस्ता आडवा खोदण्याची वेळ आली नव्हती. त्यामुळे या रोडवर एकही खड्डा पडल्याचे दिसून आले नाही; पण आता आपटे रोडवर जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी या रस्त्यावर खोदकाम करण्याची नामुष्की आली आहे. आपटे रोडवरील कोहिनूर हॉटेलपासून प्रयाग हॉस्पिटल ते भोसले शिंदे आर्केड अशी नवी पावसाळी गटार लाइन टाकली जाणार आहे. हे काम करताना जंगली महाराज रोड आडवा खोदावा लागणार आहे.
असे होणार काम
* पाच कोटींचा आराखडा तयार
* पाणी वाहून जाण्याची क्षमता वाढणार
* हाँगकाँग लेन ते नदीपात्र अशी भूमिगत पाइपलाइन टाकणार
* फर्ग्युसन रोडवर काका हलवाईच्या बाजूने डेक्कनकडे जाणाऱ्या रोडवर ४ ठिकाणी मोठे चेंबर तयार करणार
* या चेंबरवर लोखंडी जाळी टाकून पादचारी मार्गावरील पावसाळी गटारांना जोडणार
दावा दहा वर्षांचा; पण ४७ वर्षांत खड्डाच नाही
मुंबईतील रेकॉन्डो कंपनीने पुणे महापालिकेला लिहून दिले होते की, रस्ता बांधून पूर्ण झाल्यानंतर १० वर्षांपर्यंत एक खड्डा पडला तरीही रस्ता तयार करून देऊ. १ जानेवारी १९७६ ला जंगली महाराज रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. गेल्या ४७ वर्षांत यावर खड्डे पडले नाहीत.
बालगंधर्व चौकात आडवा छेद
बालगंधर्व रंगमंदिर येथे असलेला ट्रान्सफॉर्मर भूमिगत करण्यासाठी यापूर्वी चौकातून आडवा छेद घेण्यात आला होता. हे काम अतिशय चांगले झाल्याने हा जोड नंतर कोणाच्या लक्षातही येत नाही.
''डेक्कन जिमखाना, गोखले रस्ता, जंगली महाराज रस्ता येथील पावसाळी गटारांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. - श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता, मलनिस्सारण विभाग''