मोठी बातमी! बारामतीच्या 'मॅरेथॉनपटु'लता करे यांच्या पतीचं कोरोनाने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 03:58 PM2021-05-05T15:58:40+5:302021-05-05T16:52:23+5:30
२०१३ मध्ये त्या पतीच्या हृदयविकारावरील उपचाराचे पैसे मिळविण्यासाठी मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी पायाने धावल्या....
प्रशांत ननवरे-
बारामती: बारामती येथील ७२ वर्षीय मॅरेथॉनपटु लता करे यांचे पती भगवान करे यांचे बुधवारी(दि ५) कोरोनाने निधन झाले. २०१३ मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावत लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता.त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. येथील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरु असताना अखेर मंगळवारी (दि.४) रात्री त्यांच्या पतीचे निधन झाले.त्यामुळे पतीला वाचविण्यासाठीची करे यांची धाव आता कायमची थांबली आहे.
लता करे यांचे पती महिला हॉस्पीटल कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होते. मंगळवारी (दि ४) दुपारी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षा अनिता गायकवाड हॉस्पिटलकडे जात असताना त्यांना लता करे रस्त्याने जाताना दिसल्या.त्या फार अस्वस्थ वाटल्याने गायकवाड यांनी करे यांची विचारपूस केली.यावेळी करे यांनी,माझे पती अॅडमिट आहेत त्यांना औषधोपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले.यानंतर गायकवाड यांनी त्यांना औषधे घेवुन दिली. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचे मंगळवारी रात्री निधन झाले.
२०१३ मध्ये त्या प्रथम पतीच्या हृदयविकारावरील उपचाराचे पैसे मिळविण्यासाठी मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावल्या.पतीच्या उपचारासाठी वयाच्या ६४ व्या वर्षी धावणाºया लता यांची त्यांनी मिळविलेल्या विजयानंतर सर्वत्र कौतुक झाले.त्यानंतर सलग तीन वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली. तिसऱ्या वर्षी त्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावल्या होत्या. हृदयविकारातुन त्यांनी पतीला वाचविले,मात्र,कोरोनापासुन त्यांना त्या वाचवू शकल्या नाही.
करे यांच्या तिन्ही मुलींचे विवाह झाल्यावर हे कुटुंब सुमारे ९ वर्षांपूर्वी बारामतीत वास्तव्यास आले आहे.बुलढाणा येथे उत्पन्नाचे साधन नसल्याने या कुटुंबाने बारामतीत स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला.सध्या त्यांचा मुलगा एका कंपनीत चौकीदाराची नोकरी करतो,हे कुटुंंब एका भाड्याच्या खोतील वास्तव्यास आहे.
पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील काढण्यात आला आहे. लता भगवान करे,एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.विशेष म्हणजे करे यांनीच त्यांची मुख्य भूमिका चित्रपटात साकारली होती. दक्षिणात्य निर्माते ए कृष्णा अरुबोधु यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.तर नविन देशबोईना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.त्यांच्या जीवनावर आधारीत मराठी चित्रपटास ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार मार्च २०२१ मध्ये जाहीर झाला आहे.
—————————————————