...अखेर महिला व बालविकास मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर तरुणीला मिळाला 'न्याय';विनयभंगाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 09:19 PM2020-10-29T21:19:32+5:302020-10-29T21:27:32+5:30
तरुणीने वारंवार तक्रार करून देखील महाविद्यालयाने तरुणाच्या 'या' कृत्याकडे केला कानाडोळा..
पुणे : महाविद्यालयात तरुणाने सातत्याने पाठलाग करुन मित्र-मैत्रिणीसमवेत असताना वेगवेगळ्या कॉमेट करुन विनयभंग केल्याप्रकरणी महाविद्यालयाने काहीही कारवाई केली नाही. त्यानंतर या तरुणीने आपल्याकडे सोबत घडत असलेल्या गैरप्रकाराबद्दल थेट महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकुर यांच्याकडे तक्रार केली होती. अखेर डेक्कन पोलिसांनी या तरुणीला बोलावून घेत तिने दिलेल्या फिर्यादीवरुन तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
शार्दुल दिलीपराव देशपांडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा सर्व प्रकार आयएलएस विधी महाविद्यालयात सप्टेबर २०१८ पासून सुरु झाला आहे.
या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आय एल एस विधी महाविद्यालयात ही तरुणी द्वितीय वर्षात शिकत असताना वर्गात एका प्राध्यापिकेने शार्दुल देशपांडे यास गाणे गाण्यास सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी शार्दुल याने हे गाणे मी तुझ्यासाठी गायले, आता मी दारुच्या नशेत आहे, असे म्हणून या तरुणीला काही मेसेज पाठविले. हा प्रकार तिने आपल्या भावाला सांगितला. त्यानंतर शार्दुलने या तरुणीला कॉलेजमध्ये अडवून त्याला समजावून सांग नाही तर त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करेल,अशी धमकी दिली. याची या तरुणीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर ही तरुणी एकटी दिसली की, शार्दुल तिचा पाठलाग करुन बोलण्याचा प्रयत्न करीत असे. पण महाविद्यालयाकडून त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असे या तरुणीचे म्हणणे आहे.जानेवारी २०२० मध्ये एका प्राध्यापकांच्या लॉ क्लासमध्ये त्याने पुन्हा या तरुणीकडे पाहत गाणे गायले. त्याची तिने फेब्रुवारीमध्ये प्राचार्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतरही महाविद्यालयाने काहीही कारवाई केली नसल्याने या तरुणीने महिला व बालविकासमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी २३ ऑक्टोबर रोजी या तरुणीला बोलावून घेतले़ तिने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
़़़़़
याबाबत आयएलएस विधी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय जैन यांनी सांगितले की, आपण कार्यभार स्वीकारल्यानंतर या तरुणीची तक्रार समोर आली होती. या विषयाकडे आम्ही संवेदनशीलपणे पाहत आहोत. महाविद्यालयात विशाखा समिती असून तिच्या तक्रारीवर कारवाई होईल, असे पत्र या तरुणीला दिले आहे.