अखेर व्हीएमडी प्रकरणी स्मार्ट सिटीला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 08:13 PM2018-06-29T20:13:07+5:302018-06-29T20:23:00+5:30
व्हीएमडी पोल उभारण्याचे काम त्वरीत थांबवा व नियमबाह्य पोल काढून टाकण्याचे आदेश...
पुणे: स्मार्ट सिटी अतंर्गत शहरात बसविण्यात आलेल्या वाय.फाय व्ही.एम.डी (व्हेरिएबले मॅसेज डिस्प्ले) पोल बसविताना मोठ्या प्रमाणात अनियमित झाली असून,याबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. याबाबत संबंधित लार्सन अॅण्ड टुब्रो लि. कंपनीला खुलासा करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, कंपनीकडून कोणताही खुलासा देण्यात आला नाही. याबाबत अखेर महापालिकेच्या वतीने शुक्रवारी स्मार्ट सिटीलाच नोटीस काढली असून व्हीएमडी पोल बसविण्याचे काम त्वरीत थांबविण्याचे व नियमबाह्य पोल काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. स्मार्ट सिटीने पोल न काढल्यास महापालिकेकडून हे पोल काढण्यात येतील, असे देखील स्पष्ट करण्यात आले.
स्मार्ट सिटी अंतर्गत संपूर्ण शहरात विविध ठिकाणी व्ही.एम.डी (व्हेरिएबले मॅसेज डिस्प्ले) बोर्ड उभारण्यात आले आहेत. यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कोणत्याही स्वरुपाची परवानगी घेतली नाही. महापालिकेच्या जाहीरात नियमावली व वाहतूकीचे सर्व नियम धाब्यावर बसून बोर्डची उभारणा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत समोर आली. याबाबत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून स्मार्ट सिटीवर वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई देखील करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. नगरसेवक अविनाश बागवे यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नावर सभागृहात चर्चा करण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटीच्या नियमबाह्य कामांचा लेखाजोखाच सभागृहासमोर आला.सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांनी देखील शुक्रवारी तातडीने स्मार्ट सिटीला नोटीस काढून व्हीएमडी पोल बसविण्याचे काम त्वरीत थांबविण्याचे आदेश दिले. तसेच आता पर्यंत उभारण्यात आलेल्या व्हीएमडी पूल महापालिकेच्या जाहिरात व फलक नियंत्रण नियम २००३ चे तरतुदीचे पालक करीत नसल्यास असे सर्व पोल देखील त्वरीत काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीकडून ही कारवाई न झाल्यास महापालिका आपली यंत्रणा लावून नियमबाह्य पोल काढून टाकेल असे नोटीसेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.