अखेर आजी-आजोबांना मिळाले हक्काचे घर; फ्लॅट बळकावण्याचा भाडेकरूचा प्रयत्न पोलिसांमुळे फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 05:26 PM2021-02-10T17:26:02+5:302021-02-10T17:27:34+5:30
Pune Police Help to Old age couple : पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही सदनिका ज्येष्ठ दाम्पत्यास मिळवून देण्याची लेखी हमी घेऊन दिली. त्यामुळे आता काही महिन्यात सदर सदनिका ज्येष्ठ दाम्पत्यास मिळणार आहे.
बारामती - बारामती शहरातील अशोक नगर येथील ज्येष्ठ दांपत्याची सदनिका (फ्लॅट) भाडेकरूने बळकावण्याचा प्रयत्न पोलिसांमुळे फसला. ज्येष्ठ दाम्पत्याने शहर पोलीस स्टेशनकडे न्याय मागण्यासाठी धाव घेतली. पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ही सदनिका ज्येष्ठ दाम्पत्यास मिळवून देण्याची लेखी हमी घेऊन दिली. त्यामुळे आता काही महिन्यात सदर सदनिका ज्येष्ठ दाम्पत्यास मिळणार आहे.
पुणे कोर्टाने गुंड गजा मारणेसह त्याच्या २२ साथीदारांची केली निर्दोष मुक्तता
उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ,पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे,सहायक फौंजदार संदीपान माळी,पोलीस हवालदार अनिल सातपुते,पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेंडगे आदीनी त्यासाठी पुढाकार घेतला. शहरातील म.ए.सो विद्यालय या ठिकाणी उपमुख्यध्यापक म्हणून काम केलेले मृत श्रीकांत प्रभुणे व त्यांच्या मृत पत्नी उषा प्रभूने यांच्या मालकीची सदनिका अशोक नगर येथे आहे. या सदनिकामध्ये भाडे तत्वावर शिक्षक दाम्पत्य मुलासह राहत आहे. प्रभुणे पती पत्नीचे निधन झाल्यावर कायदेशीररित्या न्यायालयाच्या आदेशानुसार वारस म्हणून मृत श्रीकांत प्रभुणे यांचे बंधू संजय गजानन प्रभूने यांच्या नावावर ही सदनिका झाली आहे. संजय प्रभुणे हे सासवड येथे राहतात. परंतु यामध्ये वास्तव्याला असलेले शिक्षक दाम्पत्य सदनिकाचे भाडे देत नव्हते,विकत घ्या म्हटले तर विकत घेत नव्हते,सदनिका सोडून जा, म्हटले तर सोडून जात नव्हते. त्यामुळे संजय प्रभुणे यांनी अनेकांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना हे घर विकत देण्याचा प्रयत्न केला. भाडेकरू दांपत्याला दोनवेळा घर सोडण्यास नोटीस दिली. परंतु शिक्षक दाम्पत्य सदनिका सोडण्यास किंवा ताबा देण्यास तयार नव्हते.
तसेच प्रभुणे यांना कोणत्याच प्रकारे दाद देत नव्हते. अखेर वैतागलेल्या प्रभुणे दाम्पत्याने पोलीस निरीक्षक शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी भुजबळ यांची भेट घेऊन सर्व कहाणी सांगितली आणि कागदपत्रे दाखवली. सर्व पुरावे व परिस्थिती पाहिल्यावर त्या शिक्षक दाम्पत्यास पोलीस स्टेशनला बोलावून घेण्यात आले. त्यांना पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिसी भाषेत कायद्यानुसार कारवाई होऊ शकते हे समजवून सांगितले . त्यावर हादरलेल्या भाडेकरू दाम्पत्याने ती सदनिका सोडून जाण्याची व लवकरच सदनिकाचा ताबा प्रभुणे दाम्पत्यास देणार असल्याची लेखी हमी दिली. या मुळे ज्येष्ठ दाम्पत्यास शहर पोलिसांमुळे न्याय मिळाला. दरम्यान, पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी संगीतले की, ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक ठिकाणी विविध माध्यमातून फसवणूक होत असते .ज्येष्ठ नागरिकांनी न भिता तक्रारीसाठी पुढे यावे. त्यांना सहकार्य करण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशन कटिबद्ध आहे.